नाशिकच्या कैवल्य नागरेची महाराष्ट्र बुद्धिबळ संघात निवड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2022 01:20 AM2022-02-21T01:20:02+5:302022-02-21T01:20:27+5:30
नाशिक जिल्हा चेस असोसिएशनतर्फे दोन दिवसांच्या राज्यपातळीवरील निवडीसाठी ओपन व महिला बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. २५ फेब्रुवारीला भुवनेश्वर येथे होणाऱ्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते
नाशिक : नाशिक जिल्हा चेस असोसिएशनतर्फे दोन दिवसांच्या राज्यपातळीवरील निवडीसाठी ओपन व महिला बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. २५ फेब्रुवारीला भुवनेश्वर येथे होणाऱ्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतून पुरुष गटातून विजयी ठरलेले सुयोग वाघ (अहमदनगर) , कैवल्य नागरे (नाशिक), पुष्कर डेरे (मुंबई) , आदित्य सावळंकर (कोल्हापूर), तर महिला गटातून विजयी ठरलेले वृषाली देवधर (मुंबई), भाग्यश्री पाटील (जळगाव), अभा गावकर (पालघर), नीती गुप्ता (मुंबई) हे बुद्धिबळपटू महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील. तसेच या स्पर्धेत जलद बुद्धिबळ स्पर्धा खेळविण्यात आली.
पंचवटीतील इंद्रकुंड येथील दादा जेठानंद पागरानी ट्रस्टच्या सभागृहात स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ झाला. प्रमुख पाहुणे माजी महापौर अशोक मुर्तडक, फिडे मास्टर सजनदास जोशी, संघटनेचे अध्यक्ष विनय बेळे, डॉ. राजेंद्र सोनवणे यांचा हस्ते यशस्वी बुद्धिबळपटूंना गौरविण्यात आले. या स्पर्धेत ११ महिला आणि ११ पुरुष बुद्धिबळपटूंना आकर्षक रोख बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धेत महिला आणि पुरुष खेळाडूंना समसमान रकमेची बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेत पंच म्हणून पुणे येथून आलेले नितीन शेणवी तसेच नाशिकच्या श्रेया चिटणीस यांनी कामकाज पाहिले, तर सहायक पंच म्हणून हर्षल वालदे, माधव चव्हाण यांनी काम पाहिले. नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव सुनील शर्मा, भूषण पवार, विक्रम मावळंकर, वैभव चव्हाण, माधव चव्हाण, अजिंक्य तरटे, गौरव देशपांडे, डॉ. सचिन व्यवहारे यांनी परीश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयराम सोनावणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन विनायक वाडिले यांनीमानले .