काकासाहेब देवधर शाळेत गोंधळ ;शाळेत वाहने न सोडल्याने सुरक्षारक्षक पालकांमध्ये वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 06:57 PM2019-02-15T18:57:02+5:302019-02-15T18:59:42+5:30
दिंडोरीरोडवरील पुणे विद्यार्थी वसतिगृहाच्या काकासाहेब देवधर शाळा प्रशासनाच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात संतप्त पालकांनी शुक्रवारी (दि.१५) सकाळी शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर आंदोलन करून शाळा प्रशासनाला धारेवर धरले. शाळेतील विद्यार्थ्यांना उद्भवणाऱ्या विविध अडचणींबाबत शाळेचे मुख्याध्यापक व शाळा प्रशासनाकडे अनेकदा तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप यावेळी संतप्त पालकांनी केला.
नाशिक : दिंडोरीरोडवरील पुणे विद्यार्थी वसतिगृहाच्या काकासाहेब देवधर शाळा प्रशासनाच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात संतप्त पालकांनी शुक्रवारी (दि.१५) सकाळी शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर आंदोलन करून शाळा प्रशासनाला धारेवर धरले. शाळेतील विद्यार्थ्यांना उद्भवणाऱ्या विविध अडचणींबाबत शाळेचे मुख्याध्यापक व शाळा प्रशासनाकडे अनेकदा तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप यावेळी संतप्त पालकांनी केला.
दिंडोरीरोड परिसरातील पुणे विद्यार्थी वसतिगृहाची काकासाहेब देवधर शाळा व महाविद्यालयातील सुरक्षारक्षकांनी शुक्रवारी (दि.१५) विद्यार्थ्यांच्या पालकांना वाहने नेण्यास मज्जाव केला. त्यामुळे संतापलेल्या पालकांनी शाळा प्रशासनावर आरोपांच्या फैरी झाडत शाळेच्या आवारात असलेल्या शौचालयात पाणी नाही, शिक्षकांच्या वारंवार बदल्या होतात, शाळेने ई-लर्निंगचे दरमहा पाचशे रुपये याप्रमाणे पैसे घेतलेले आहे. विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरवर शिकविले जाते, मात्र प्रोजेक्टर पंधरा दिवस चालू तर पंधरा दिवस बंद असतात. वारंवार शिक्षकांच्या बदल्या होत असल्याने त्यांच्या जागी येणाºया शिक्षकांकडून प्रोजेक्टरवर शिकविल्या जाणाºया माहितीत तफावत असते. याशिवाय शाळेतीलच तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी आवारात गुटखा खातात, तर कधी कधी विद्यार्थिनींसोबत छेड काढण्याचे प्रकारही घडतात. मात्र शाळेचे सुरक्षारक्षक विद्यार्थ्यांच्या पालकांना मुख्याध्यापक अथवा संचालकांना भेटून देत नसल्याचा आरोप पालकांनी यावेळी केला. दरम्यान, याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
तीन वर्षांपासून पालकांसोबत बैठक नाही
गेल्या तीन वर्षांपासून शालेय व्यवस्थापन समिती व पालक वर्गांची बैठक झालेली नाही असा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी करून शाळा प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्तकेली. सुमारे तासभर पालकांनी प्रवेशद्वारावर उभे राहून आंदोलन केले. त्यानंतर म्हसरूळ पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर या संदर्भात शनिवारी (दि.१६) पालक व शाळा व्यवस्थापनाची बैठक घेऊन त्यात चर्चा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
शाळा प्रशासनाचे दुर्लक्ष
विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवेशद्वारावर सोडले तर त्यांना पायी जावे लागते. या ठिकाणी महाविद्यालय असल्याने महाविद्यालयातील विद्यार्थी वेगाने वाहने ने-आण करतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना उद्भवणाऱ्या अडचणींबाबत वारंवार शाळेच्या संचालकांना व मुख्याध्यापक मनीषा साठे यांच्याकडे तक्रार मांडण्यासाठी पालकांना शाळेचे सुरक्षारक्षक जाऊ देत नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे. -सचिन पवार, पालक