कळवणच्या शेतकऱ्यांनी गाठले कुष्णकुंज
By admin | Published: September 11, 2015 10:56 PM2015-09-11T22:56:00+5:302015-09-11T22:58:04+5:30
राज ठाकरे : शेतकऱ्यांनी आत्महत्त्येचा मार्ग धरू नये
कळवण : यंदा पाऊस कमी पडल्याने महाराष्ट्रात सर्वत्र दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. आर्थिक नियोजन कोलमडून गेल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्त्येचा मार्ग धरू नका, यामुळे प्रश्न सुटणार नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना खंबीरपणे उभी राहील, अशी ग्वाही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली.
कळवण तालुक्यातील विविध भागातील शेतकरी बांधवांचे शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबई येथे कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेऊन कैफियत मांडली. मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येचे लोण कळवणसारख्या आदिवासी तालुक्यात येऊन पोहोचल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
राज ठाकरे म्हणाले, शेतकरी बांधवांनी संयम ठेवावा, आत्महत्त्या करून प्रश्न सुटणार नाही तर प्रश्न वाढतील त्यामुळे धीर धरा, असे आवाहन केले.
नाशिक जिल्ह्यातील
विविध प्रश्नांवर चर्चा करून नार-पार योजनेसह प्रलंबित
असलेल्या प्रश्नाबाबत माहिती घेऊन ग्रामीण भागातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम यापुढे मनसे
करणार असल्याची ग्वाही ठाकरे यांनी दिली.
यावेळी जिल्ह्याच्या विविध समस्यांचे निवेदन प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले, जिल्हाध्यक्ष
सुदाम कोंबडे, जिल्हा परिषद
सदस्य संदीप पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अजय दुबे, तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील व शहराध्यक्ष नितीन पगार यांनी राज ठाकरे
यांना देऊन विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले.
कळवणचे प्रगतिशील शेतकरी दिनकर पगार, मुरलीधर पगार, सुरेश देवरे, जिभाऊ वाघ, लखन अहेर, दादाजी पाटील, भय्या पगार, दीपक दुसाने आदिंसह शेतकरी बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)