संभाजी ब्रिगेडसह वंचितने उधळला मुक्त विद्यापीठातील कलश पुजनाचा कार्यक्रम
By संकेत शुक्ला | Published: December 30, 2023 03:40 PM2023-12-30T15:40:46+5:302023-12-30T15:41:24+5:30
संस्थेच्या प्रांगणात कार्यक्रम घेण्यास विरोध : कुलगुरूंना राज्यघटनेची प्रत देण्याची घोषणा
नाशिक : अयोध्येतील राममंदिराकडे जाण्यासाठी निघालेल्या मंगल कलशाची सर्वत्र पुजा होत असताना त्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजीत मंगल कलश पुजनाचा कार्यक्रम वंचित बहूजन आघाडीसह संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावला. रामाला आमचा विरोध नाही, मात्र विद्यापीठ शासकीय जागा असून त्या ठिकाणी हा कार्यक्रम कसा घेतला जातो याबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
नाशिकमध्ये येणाऱ्या या मंगलकलशाचे ठिकठिकाणी स्वागत करण्याचे कार्यक्रम शनिवारी नाशिक शहरात आयेजीत करण्यात आले होते. त्यामध्ये अखील भारतीय विद्यार्थी परीषदेने विनंती केल्यामुळे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी विद्यापीठाच्यावतीने सगळ्यांना आमंत्रणही पाठविण्यात आले होते. मंगल कलश ठेवल्यानंतर कार्यक्रमाला सुरवात होण्यासाठी काही अवधी शिल्लक असतानाच दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमस्थळी येत या कार्यक्रमाला आक्षेप घेतला. त्यानंतर थोड्याच वेळात हा कार्यक्रम आवरण्यात आला. यासंदर्भात विद्यापीठाच्यावतीने उशिरापर्यंत कोणतीही भूमिका मांडण्यात आली नव्हती.
मंगल कलक्ष अक्षदा कार्यक्रम धार्मिक असताना शासकीय जागेत त्याचा कार्यक्रम घेता येणार नाही अशी भूमिका घेत या कार्यक्रमाला आमचा विरोध नही, मात्र त्यासाठी जागा चुकीची आहे. जर अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेकडे त्यासाठी जागा नसेल तर आम्ही जागा उपलब्ध करून देऊ अशी भूमिका घेत त्यांनी हा कार्यक्रम उधळून लावला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश सदस्य चेतन गांगुर्डे, संभाजी ब्रिगेडचे संतोष गायधनी यांसह पदाधिकारी उपस्थित होते.
मुक्त विद्यापीठाची जागा प्रशासकीय आहे. भारतीय राज्यघटनेच्या सुचनांनुसार अशा ठिकाणी धार्मिक कार्यक्रम घेता येत नाही. विद्यापीठाने त्यासाठी परिपत्रक कसे काढले? यासंदर्भात तक्रार करण्यात येऊन पुढील कारवाईसाठी आम्ही प्रयत्न करणार असून कुलगुरुंना राज्यघटनेची प्रतही देणार आहोत. - चेतन गांगुर्डे (सदस्य, वंचित आघाडी)