कालीचरण बाबाच्या नववर्षाची सुरुवात तुरुंगातच, 13 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 09:26 PM2021-12-31T21:26:44+5:302021-12-31T21:30:11+5:30
छत्तीसगडमधील रायपूर पोलिसांनी मध्य प्रदेशमधील खजुराहो येथून कालीचरण महाराजला ताब्यात घेऊन त्यांच्यावर अटकेची कारवाई केली. त्यानंतर, न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने कालीचरण यास 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
नवी दिल्ली - महात्मा गांधी यांच्याबाबत धर्म संसदेमध्ये अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराजाला अखेर पोलिसांनी अटक केली. कालीचरण महाराजने महात्मा गांधींवर केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर देशभरातून संतापाची लाट उसळली होती. तसेच त्याच्याविरोधात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर, रायपूर पोलिसांनी त्यास अटक करुन न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यास 13 जानेवारीपर्यंत न्यायायलयीन कोठडीत पाठवले आहे. होते. तत्पूर्वी न्यायालयाने कालीचरणला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यामुळे, कालीचरण बाबाच्या नववर्षाची सुरुवात तुरुंगातच होणार आहे.
छत्तीसगडमधील रायपूर पोलिसांनी मध्य प्रदेशमधील खजुराहो येथून कालीचरण महाराजला ताब्यात घेऊन त्यांच्यावर अटकेची कारवाई केली. त्यानंतर, न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने कालीचरण यास 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. याप्रकरणी, आज न्यायालयात सुनावणी झाली असता त्यास 13 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, 3 जानेवारी रोजी रायपूर कोर्टात जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये दोन दिवसीय धर्म संसदेचे आयोजन करण्यात आले होते. स्वामी परमात्मानंद, संत रामप्रिया दास, संत त्रिवेणी दास, हनुमान गढी अयोध्येचे महंत रामदास, साध्वी विभा देवी, जुना आखाड्याचे स्वामी प्रबोधानंद आणि अकोल्याचे कालीचरण यांच्यासह अनेक संतांनी धर्म संसदेला हजेरी लावली होती. तिथे कालीचरण महाराजाने महात्मा गांधींना शिव्यांची लाखोली वाहिली होती. यावेळी त्याने खालच्या दर्जाचे असे शब्द वापरले आहेत.
पोलिसांत गुन्हा दाखल
कालीचरण महाराजाच्या या विधानामुळे वाद पेटला होता. कालीचरण हा फक्त गांधीजींना शिविगाळ करुन थांबला नाही तर गांधीजींची हत्या करणाऱ्या नथूराम गोडसेचेही त्याने आभार मानले होते. त्याच्या कृतीचं चक्क कौतुक केलं होतं. त्यानंतर कालीचरण महाराज याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध टिकरापारा पोलीस ठाण्यात भादंवि कलम २९४ आणि ५०५ (२) अन्वये गुन्हा दाखल केला होता. रायपुरचे माजी महापौर आणि सभापती प्रमोद दुबे यांनी कालीचरण याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.