कालिदासची भाडेवाढ गोपनीय बाब ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 12:47 AM2018-09-16T00:47:25+5:302018-09-16T00:48:22+5:30
महापालिकेच्या महाकवी कालिदास कलामंदिराच्या दरवाढीवरून रण पेटले असताना प्रशासनाने मात्र ही माहितीच आता दडपण्याचा कारभार सुरू केला आहे. स्थायी समितीवर सादर केलेले प्रस्ताव दाखवता येत नाहीत, अशी नवी परंपराच सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे दरवाढ झाली तेव्हा त्याचा प्रस्ताव जगजाहीर झाला, परंतु दर कमी झाले तेव्हा मात्र तो गोपनीय ठेवण्यामागे गूढ काय? असा प्रश्न चर्चिला जात आहे.
नाशिक : महापालिकेच्या महाकवी कालिदास कलामंदिराच्या दरवाढीवरून रण पेटले असताना प्रशासनाने मात्र ही माहितीच आता दडपण्याचा कारभार सुरू केला आहे. स्थायी समितीवर सादर केलेले प्रस्ताव दाखवता येत नाहीत, अशी नवी परंपराच सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे दरवाढ झाली तेव्हा त्याचा प्रस्ताव जगजाहीर झाला, परंतु दर कमी झाले तेव्हा मात्र तो गोपनीय ठेवण्यामागे गूढ काय? असा प्रश्न चर्चिला जात आहे.
महापालिकेच्या वतीने कालिदास कलामंदिराचे दर वाढविण्यात आले. त्यावरून कलावंतांसह सर्वच क्षेत्रातून तीव्र पडसाद उमटले. कलामंदिराचे नूतनीकरण केले असले तरी ते महापालिकेचे कामच असताना त्याचा खर्च वसूल करण्यासाठी नाटकाचे भाडे चार हजारांवरून २१ हजारांवर तर वाद्यवृंद आणि आॅर्केस्ट्राचे भाडे थेट ४० हजार रुपयांवर नेण्याचा प्रस्ताव आहे. त्यावर चहुबाजूंनी टीका झाल्यानंतर आता महापालिकेने कालिदासचे भाडे ही गोपनीय बाब ठरवली असून, स्थायी समितीवर प्रस्ताव असल्याने माहिती देता येत नाही असे सांगून दडपण्याचे काम सुरू केल्याने नगरसेवकही संतप्त झाले असून, संंबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे.