कालिदास कलामंदिर खासगीकरणानंतर वाढेल व्यावसायिकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:02 AM2018-06-23T00:02:18+5:302018-06-23T00:02:33+5:30
शहरातील सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या कालिदास कलामंदिराचे खासगीकरण करण्याचा पालिकेचा विचार असून, या गोष्टीला सर्व स्तरातून विरोध होत आहे.
नाशिक : शहरातील सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या कालिदास कलामंदिराचे खासगीकरण करण्याचा पालिकेचा विचार असून, या गोष्टीला सर्व स्तरातून विरोध होत आहे. कालिदासचे खासगीकरण झाल्यास आजवर वर्षानुवर्षे या संस्थेत मिळणारा जिव्हाळा क्षणात दूर होऊन तेथे व्यावसायिक वृत्ती वाढीस लागेल. याचा फटका आयोजकांना तर बसेलच; पण नाशिककर रसिकांनाही त्याची झळ बसेल. त्यामुळे कालिदासचे खासगीकरण होऊ नये, अशा भावना वितरक, शैक्षणिक संस्था, नृत्य संस्था आदींच्या प्रतिनिधींनी बोलून दाखविल्या. याबाबत त्यांच्याशी साधलेला हा संवाद.
महाकवी कालिदास कलामंदिराचे खासगीकरण करू नये कारण त्यामुळे आयोजक आणि नागरिक दोघांनाही आर्थिक फटका सहन करावा लागेल. जर महापालिकेला ताकदीने कालिदासचे व्यवस्थापन पेलवणार असेल तर खासगीकरण करण्याची गरजच पडणार नाही. कालिदासचे आधुनिकीकरण झाले आहे. ते तसेच टिकून राहील याची काळजी घ्यावी.
- विद्या देशपांडे, प्रसिद्ध नृत्यांगना
कालिदास कलामंदिरचे खासगीकरण होऊ नये. खासगीकरण झाल्यास आॅर्केस्ट्रा, नृत्य कार्यक्रम, शाळांची स्नेहसंमेलने, पुस्तक प्रकाशन अशा संस्थांना खासगीकरणानंतरचे वाढीव दर परवडणार नाही. अशा लहान संस्था आधीच मोठी जुळवाजुळव करून कार्यक्रम पार पाडतात. यासाठी छोट्या संस्थांना मोठी आर्थिक कसरत करावी लागते. त्यात आता खासगीकरण झाल्यास सगळेच गणित कोलमडेल. शिवाय आपुलकी, जिव्हाळा या गोष्टीही दुरापास्त होतील.
- उमेश गायकवाड, आॅर्केस्ट्रा असोसिएशन