कालिदास कलामंदिर महापालिकाच चालविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 01:16 AM2018-07-10T01:16:52+5:302018-07-10T01:17:08+5:30
शहराची सांस्कृतिक वास्तू असलेल्या महाकवी कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण करण्यात आल्यानंतर आता त्याचे खासगीकरण करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव असला तरी हे नाट्यगृह महापालिकाच चालविणार आहे. केवळ स्वच्छता तसेच अन्य तांत्रिक बाबी ठेकेदारामार्फत चालविल्या जाणार आहेत. याशिवाय तारखा विक्रीसारखे गैरप्रकार घडू नये यासाठी आॅनलाइनद्वारे नोंदणी बरोबरच आणखी काही नियम तयार करण्यात येणार आहेत.
नाशिक : शहराची सांस्कृतिक वास्तू असलेल्या महाकवी कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण करण्यात आल्यानंतर आता त्याचे खासगीकरण करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव असला तरी हे नाट्यगृह महापालिकाच चालविणार आहे. केवळ स्वच्छता तसेच अन्य तांत्रिक बाबी ठेकेदारामार्फत चालविल्या जाणार आहेत. याशिवाय तारखा विक्रीसारखे गैरप्रकार घडू नये यासाठी आॅनलाइनद्वारे नोंदणी बरोबरच आणखी काही नियम तयार करण्यात येणार आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून महाकवी कालिदास मंदिराच्या खासगीकरणाचा मुद्दा गाजत आहे. महापालिकेचे कालिदास कलामंदिर ही शहरवासीयांची सांस्कृतिक वास्तू आहे. गेल्या काही वर्षांत कालिदासची अवस्था बिकट होत चालली होती. त्यामुळे रंगकर्मी नाराज होते. केवळ स्थानिक कलावंतच नाही तर मोहन जोशी तसेच प्रशांत दामले यांसारख्या मान्यवर कलावंतांनीदेखील महापालिकेचे वाभाडे काढले होते. त्यानंतर स्मार्ट सिटी कंपनीने या कलामंदिराच्या विषयाला हात घातला. गेल्या वर्षभरापासून महापालिकेने कलामंदिराचे नूतनीकरण सुरू असून, आता ते पूर्ण झाले आहे. दरम्यान, मध्यंतरी स्मार्ट सिटी कंपनीच्या बैठकीत कालिदास कलामंदिराचे खासगीकरण करण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली त्यामुळे नाट्यप्रेमींमध्ये अस्वस्थता आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने यासंदर्भात लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन विरोध करण्यात आला. त्याचप्रमाणे अन्य रंगकर्मी तसेच सांस्कृतिक क्षेत्राशी निगडित मान्यवरांच्या भावना ‘लोकमत’ने मांडल्या होत्या. आयुक्तांनी या कलामंदिराचे खासगीकरण न करता केवळ साफसफाईसह काही मर्यादित बाबींचे खासगीकरण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले असून, पूर्णत: खासगीकरण केले जाणार नाही, असा दिलासा त्यांनी दिला आहे.
दरम्यान, ‘कालिदास’मध्ये अन्य राज्यातील अन्य नाट्यगृहांप्रमाणे तारखा विक्रीचा धंदा होऊ नये यासाठी महापालिकेच्या वतीने आता आॅनलाइन बुकिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय तीन महिन्यांपेक्षा अधिक पुढील महिन्याची आगाऊ नोंदणी करता येणार नाही. बुकिंग करताना सर्व रक्कम भरणे आवश्यक अशा प्रकारची एक नियमावलीदेखील तयार करण्यात येणार असून, त्यामुळे गैरप्रकारांना आळा घालणे शक्य आहे.