कालिदास कलामंदिराच्या दरात केलेली घट हास्यास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 11:38 PM2018-10-17T23:38:58+5:302018-10-18T00:13:52+5:30
महापालिकेच्या वतीने महाकवी कालिदास कलामंदिराच्या दरात केलेली अल्पशी कपात म्हणजे हास्यास्पद प्रकार असून, याद्वारे रंगकर्मी व रसिकांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखे केले असल्याची भावना रंगकर्मी व नाट्य परिषद सदस्यांनी व्यक्त केली आहे.
नाशिक : महापालिकेच्या वतीने महाकवी कालिदास कलामंदिराच्या दरात केलेली अल्पशी कपात म्हणजे हास्यास्पद प्रकार असून, याद्वारे रंगकर्मी व रसिकांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखे केले असल्याची भावना रंगकर्मी व नाट्य परिषद सदस्यांनी व्यक्त केली आहे. स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके यांनी भाडेवाढीसंबंधीचा निर्णय सांगितला. त्यानुसार शनिवारी आणि रविवारी असणाऱ्या नाटकांकडून अतिरिक्त अडीच हजार रुपये आकारले जाणार नाहीत. महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण करून चौपट आणि पाचपट भाडे वाढविल्याने रंगकर्मींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच सभापती हिमगौरी आडके यांनी रंगकर्मींना दिलासा देऊ असे जाहीर केले असले तरी यापूर्वी स्थायी समितीने फार दिलासा दिला नव्हता. शनिवारी आणि रविवारी सर्वाधिक मागणी असलेल्या दिवशी अडीच हजार रुपयांची केली जाणारी आकारणी रद्द ठरविली आहे.
कालिदास कलामंदिराची किरकोळ दरवाढ कमी करून रडत्याचे डोळे पुसले जातात. महापालिकेच्या इतिहासात असा प्रकार पहिल्यांदाच होत आहे. संपूर्ण भाडेवाढ रद्द करून पूर्वीचेच दर आकारणे गरजेचे आहे.
- शाहू खैरे, नगरसेवक
कालिदासची भाडेवाढ अन्यायकारक आहे अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर भाडेवाढ रद्द होईल का? त्रुटी दूर होतील का? असा प्रश्न पडला आहे. - सदानंद जोशी, ज्येष्ठ रंगकर्मी