शाळांसाठी ‘कालिदास’ खुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 12:03 AM2019-12-19T00:03:00+5:302019-12-19T00:06:16+5:30
स्मार्ट सिटी अंतर्गत महाकवी कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण करण्यात आल्यानंतर त्याठिकाणी शाळांच्या स्नेहसंमेलनांना अघोषित बंदी घालण्यात आली होती. मात्र यापुढे शाळांसाठी हे कलामंदिर खुले करण्याचे आदेश स्थायी समितीचे सभापती उद्धव निमसे यांनी दिले आहेत.
नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत महाकवी कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण करण्यात आल्यानंतर त्याठिकाणी शाळांच्या स्नेहसंमेलनांना अघोषित बंदी घालण्यात आली होती. मात्र यापुढे शाळांसाठी हे कलामंदिर खुले करण्याचे आदेश स्थायी समितीचे सभापती उद्धव निमसे यांनी दिले आहेत.
महाकवी कालिदास कलामंदिराचे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पाअंतर्गत नूतनीकरण करण्यात आले आहे. त्यातून त्याचे रूपडे पालटल्यानंतर त्याचे दरदेखील वाढविण्यात आले आहेत. अनेक प्रकारचे नियम बदलण्यात आले आहेत. कालिदासचे नवे रूप ‘जैसे थे’ रहावे आणि त्याला बाधा येऊ नये यासाठी महापालिकेच्या वतीने परस्परच शाळांच्या स्नेहसंमेलनाला परवानगी दिली जात नसल्याचे
उघड झाले आहे. शाळांच्या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या उत्साहात खुर्च्यांची मोडतोड होऊ शकते, असे गृहीतक मांडून परस्पर शाळांना स्नेहसंमेलनासाठी परवानग्या नाकारल्या जात होत्या. सदरचा प्रकार लक्षात आल्यानंतर निमसे यांनी शाळांच्या स्नेहसंमेलनासाठी कलामंदिर खुले करण्याचे आदेश व्यवस्थापन जगन्नाथ कहाणे यांना दिले आहे.
दरम्यान, नाट्य व्यावसायिक जयप्रकाश जातेगावकर आणि राजेंद्र जाधव यांनी सभापती निमसे यांची नुकतीच भेट घेतली जाचक नियम बदलण्याची मागणी केली आहे.
पूर्वी चार तासांचे सत्र होते. आता तीन तासांचेच सत्र असून, त्यात पूर्वीप्रमाणेच बदल करावा. कलामंदिराबाहेरील नाटकांच्या जाहिरात फलकांसाठी आकारले जाणारे प्रतिदिन शुल्क रद्द करावे, पाचशे रुपयांच्या आत तिकीट असेल तर वेगळे शुल्क आणि पाचशेपेक्षा अधिक दर असेल तर वेगळे शुल्क असे दर पत्रक ठरले होते. मात्र त्यात ऐनवेळी जाचक बदल करण्यात आला. तो ठरल्याप्रमाणेत करण्यात यावा, नाटक रद्द झाल्यास अनामत रक्कम परत मिळावी, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत.
लावण्यांनाही परवानगी देणार
कलामंदिरात यापूर्वी लावण्यांना परवानगी होती. मात्र लावणीच्या कार्यक्रमास अनेक जण मद्यपान करून येत, तर काही कार्यक्रमस्थळी मद्यपान करत असत. काहीवेळा लावणीच्या नावाखाली अश्लील कार्यक्रम सादर होत असल्याने हा प्रकार वादग्रस्त ठरला होता. कार्यक्रमाच्या दरम्यान कलामंदिराच्या खुर्च्या आणि अन्य साहित्यांचे नुकसान होत असल्याने अखेरीस महापालिकेने लावण्यांना बंदी घातली होती. मात्र सभापती निमसे यांनी लावणी ही महाराष्टÑाची परंपरा असून या कार्यक्रमांनादेखील परवानगी देण्यात येईल, असे सांगितले. कालामंदिरात सीसीटीव्ही लावण्यात येईल त्यामुळे मद्यपानाला प्रतिबंध होऊ शकेल, असेही ते म्हणाले.