कालिदास नूतनीकरण दोन्ही कॉँग्रेस आक्रमक
By admin | Published: July 14, 2017 01:25 AM2017-07-14T01:25:47+5:302017-07-14T01:26:03+5:30
नाशिक : महाकवी कालिदास कलामंदिराच्या करण्यात येणाऱ्या नूतनीकरणाबाबत कॉँग्रेस-राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत सुमारे नऊ कोटी रुपये खर्चून महाकवी कालिदास कलामंदिराच्या करण्यात येणाऱ्या नूतनीकरणाबाबत विविध शंका उपस्थित करत कॉँग्रेस-राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. नूतनीकरणाच्या कामाबाबत स्थानिक नगरसेवकांना अंधारात ठेवल्याने येत्या महासभेत कॉँग्रेस-राष्ट्रवादीमार्फत लक्षवेधी मांडली जाणार असून, प्रशासनाला जाब विचारला जाणार आहे.
स्मार्ट सिटी अभियानांतर्गत महाकवी कालिदास कलामंदिराचे तीस वर्षांनंतर पहिल्यांदाच नूतनीकरण केले जाणार असून, त्यासाठी नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन या कंपनीने महापालिकेला ९ कोटी रुपये देऊ केले आहेत. मागील महिन्यात कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत नूतनीकरणाच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे.
त्यानुसार, येत्या १६ जुलैपासून नूतनीकरणाच्या कामासाठी कालिदास कलामंदिर वर्षभर बंद ठेवण्यात येणार आहे. कालिदास कलामंदिर नूतनीकरण कामाच्या शुभारंभाचा जंगी सोहळा आयोजित करण्याची तयारी एकीकडे भाजपाने चालविली असताना आता कॉँग्रेस-राष्ट्रवादीने या नूतनीकरणाच्या कामाबाबत स्थानिक नगरसेवकांना पूर्णपणे अंधारात ठेवल्याबद्दल आक्रमक भूमिका घेतली आहे. कालिदास कलामंदिर हे प्रभाग १३ मध्ये येते. या प्रभागात कॉँग्रेसचे गटनेते शाहू खैरे, वत्सला खैरे, राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार आणि मनसेच्या सुरेखा भोसले हे महापालिकेचे प्रतिनिधित्व करत आहेत. कालिदास कलामंदिराच्या नूतनीकरणाचे काम सर्वप्रथम महापालिकेच्या निधीतून करण्याचा निर्णय झाला होता. त्यासाठी अंदाजपत्रकात ६ कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली होती मात्र, नंतर स्मार्ट सिटी कंपनीमार्फत नऊ कोटींचा निधी देत नूतनीकरणाच्या निविदा अंतिम करण्यात आल्या. या कामाबाबत स्थानिक नगरसेवकांना कसलीही माहिती देण्यात आली नाही, तसेच स्थानिक रंगकर्मींकडूनही सूचना मागविण्यात आल्या नाहीत. नूतनीकरण कामावर करण्यात येणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाबाबतही कॉँग्रेस-राष्ट्रवादीने संशय व्यक्त केला असून, येत्या महासभेत लक्षवेधी मांडण्याची तयारी चालविली आहे.