कालिका यात्रोत्सवाची जय्यत तयारी
By admin | Published: September 23, 2016 01:33 AM2016-09-23T01:33:07+5:302016-09-23T01:33:40+5:30
२४ तास दर्शन : चांदीच्या महिरपीला पॉलिश; सजावटीचे काम सुरू
नाशिक : ग्रामदेवता कालिका देवी यात्रोत्सवाची जय्यत तयारी देवस्थानच्या आवारात सुरू आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात मूर्तीभोवती असलेल्या चांदीच्या महिरपीला पॉलिश केली जात आहे. गाभाऱ्याचे रंगकाम पूर्ण झाले असून, यात्रोत्सवाच्या दृष्टीने विश्वस्त मंडळाचे नियोजन पूर्ण झाले आहे.
सालाबादप्रमाणे यावर्षीही नवरात्रोत्सवामध्ये नऊ दिवस कालिका मातेची यात्रा भरणार आहे. येत्या १ सप्टेंबरपासून यात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. जुना मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या कालिका देवी मंदिराच्या परिसरात यात्रोत्सवाच्या तयारीला वेग आला असून बहुतांश कामे पूर्णत्वाकडे आहे. येत्या दहा दिवसांमध्ये सर्वच लहान-मोठी कामे आटोपणार आहेत.
यावर्षी विश्वस्त मंडळाकडून पोलिसांच्या मदतीला दोनशे स्वयंसेवक तसेच एका खासगी कंपनीचे पन्नास कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. पंधरा दिवसांसाठी भाविकांचा दोन लाखांचा विमा उतरविण्यात आला असून, देवीच्या दागिन्यांचा वर्षभरासाठीचा दीड लाखाचा विमा विश्वस्त मंडळाने उतरविला असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष केशव पाटील यांनी दिली. रस्त्यावरील मुख्य प्रवेशद्वारापासून तर मंदिराचा संपूर्ण परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली असून देवस्थानच्या वतीने एकूण २४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)