कालिका यात्रोत्सवात उसळली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 12:55 AM2018-10-14T00:55:00+5:302018-10-14T00:55:36+5:30
नवरात्रोत्सव म्हटला की, कालिका देवी यात्रोत्सवाचे सगळ्यांनाच आकर्षण असते. दुसऱ्या शनिवारी (दि.१३) शासकीय सुटी असल्यामुळे संध्याकाळी यात्रोत्सवात भाविकांची गर्दी उसळली. देवीच्या दर्शनासाठी भाविकांची रांगा लागल्या होत्या.
नाशिक : नवरात्रोत्सव म्हटला की, कालिका देवी यात्रोत्सवाचे सगळ्यांनाच आकर्षण असते. दुसऱ्या शनिवारी (दि.१३) शासकीय सुटी असल्यामुळे संध्याकाळी यात्रोत्सवात भाविकांची गर्दी उसळली. देवीच्या दर्शनासाठी भाविकांची रांगा लागल्या होत्या.
जुना मुंबई-आग्रा महामार्गावरील कालिका देवी मंदिराच्या परिसरात यात्रोत्सव सुरू आहे. यात्रेचा शनिवारी चौथा दिवस असल्याने भाविकांचा महापूर बघावयास मिळाला. कारण यात्रोत्सवाचा येत्या गुरुवारी समारोप होत आहे. त्यामुळे सुटीची संधी साधत भाविकांनी यात्रोत्सवाला मोठ्या संख्येने हजेरी लावली. रविवारी (दि.१४) संध्याकाळीही यात्रोत्सवात अलोट गर्दी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. देवी मंदिराच्या आवारात मोठ्या संख्येने प्रसाद विक्रे त्यांनी दुकाने थाटली आहेत. पेढे, रेवडी-गुडीशेव खरेदीसाठी भाविकांकडून पसंती दिली जात आहे. तसेच यावर्षी रस्त्याच्या एकतर्फा दुकाने थाटण्यास पोलीस, महापालिकेने परवानगी दिल्यामुळे दुकानांची संख्या कमी झाल्याचे जाणवत आहे. रहाटपाळणे अधिक असल्याने आबालवृद्धांकडून विविध प्रकारच्या या रहाटपाळण्यांचा आनंद लुटला जात आहे. एकूणच यात्रोत्सवात भाविकांच्या उत्साहाला उधाण आले असून, शनिवारसह रविवारीही नाशिककरांची गर्दी होण्याची चिन्हे दिसत आहे.