कालिदास कलामंदिरचे व्यवस्थापककहाणे अखेर निलंबित
By admin | Published: June 18, 2015 12:05 AM2015-06-18T00:05:58+5:302015-06-18T00:06:51+5:30
दुरवस्था भोवली : अतिरिक्त आयुक्तांकडून कारवाई
नाशिक : महाकवी कालिदास कलामंदिरातील अव्यवस्थेबाबत अभिनेता भरत जाधव यांनी चार दिवसांपूर्वी व्यक्त केलेल्या नाराजीनंतर एकूणच कालिदासची दुरवस्था लक्षात घेता अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांनी त्याची गंभीर दखल घेत कालिदासचे व्यवस्थापक जगन्नाथ कहाणे यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई केली आहे. कहाणे यांच्याबद्दल वाढत्या तक्रारींमुळे अतिरिक्त आयुक्तांनी केलेल्या कारवाईचे रंगकर्मींनी स्वागत केले आहे.
गेल्या शनिवारी अभिनेता भरत जाधव यांच्या ‘श्रीमंत दामोदर पंत’ या नाटकाचा कालिदास कलामंदिरात प्रयोग होता. परंतु आधीच्या कार्यक्रमामुळे प्रयोगाला झालेला विलंब, तसेच कालिदास कलामंदिरातील अस्वच्छता, अव्यवस्था पाहून भरत जाधव कमालीचे संतापले आणि थेट महापालिका आयुक्तांनाच दूरध्वनी करून नाराजी व्यक्त केली. आयुक्त डॉ. गेडाम हे सिंहस्थ कामात व्यस्त असल्याने त्यांनी अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांना भरत जाधव यांची भेट घेण्यासाठी पाठविले होते. सोनवणे यांनी महिनाभरात कालिदासची स्थिती सुधारण्याचे आश्वासन दिल्यानंतर भरत जाधव यांच्या रागाचा पारा खाली आला होता. दरम्यान, सोनवणे यांनी त्यावेळी कालिदासचे व्यवस्थापक जे. के. कहाणे यांचेशी मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, कहाणे यांचा मोबाइल स्विच आॅफ होता. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांनी कालिदासच्या एकूणच स्थितीचा अहवाल मागविला होता. याशिवाय सोनवणे यांनी शहरातील काही रंगकर्मींचीही मते जाणून घेतली. त्यात कालिदासचे व्यवस्थापक कहाणे यांच्याविषयी तक्रारींचा पाऊस पडत कहाणे यांना त्वरित हटविण्याची सूचना रंगकर्मींनी केली होती. अखेर अतिरिक्त आयुक्तांनी बुधवारी कहाणे यांना कालिदासच्या दुरवस्थेबद्दल जबाबदार ठरवित त्यांच्यावर निलंबनाचा बडगा उगारला आहे. याशिवाय कहाणे यांच्याकडे दादासाहेब फाळके स्मारकाचाही कार्यभार असून, स्मारकातील कर्मचाऱ्यांना पाच महिन्यांपासून वेतनच केले नसल्याची बाबही समोर आली आहे.
वाढत्या तक्रारी लक्षात घेता अतिरिक्त आयुक्तांनी निलंबनाचे आदेश काढले. अतिरिक्त आयुक्तांनी केलेल्या या कारवाईचे रंगकर्मींनी स्वागत केले असून, कालिदासला ‘अच्छे दिन’ आणण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)