कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य : यंदा वणवा भडकला नाही...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 03:03 PM2020-05-24T15:03:36+5:302020-05-24T15:26:42+5:30

यावर्षी कोरोना आजाराचे संकट देशासह राज्यावर आले आहे. यामुळे मागील दोन महिन्यांपासून लॉकडाउन राज्यात घोषित करण्यात आला आहे. तसेच वन्यजीव विभागानेही पर्यटकांसाठी अभयारण्यांचे दरवाजे बंद ठेवले आहेत. यामुळे उन्हाळ्यात पर्यटक या भागात फिरकलेच नाही.

Kalsubai-Harishchandragad Sanctuary: | कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य : यंदा वणवा भडकला नाही...!

कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य : यंदा वणवा भडकला नाही...!

googlenewsNext
ठळक मुद्देअभयारण्यक्षेत्रातील गावांमध्ये जनजागृतीग्रामपंचायतीला ५ हजारांचे बक्षीसकृत्रिम वणवे पसरविणे वन कायद्यानुसार गंभीर गुन्हा

नाशिक : भंडारदरा वनपरिक्षेत्र ते राजूर वनपरिक्षेत्रांतर्गत पसरलेल्या कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या परिसरात यावर्षी स्थानिक लोकसहभाग आणि लॉकडाउन सुरू असल्याने बाहेरून पर्यटक दाखल न झाल्यामुळे कृत्रिम वनवणव्यांचा भडका फारसा उडाला नाही. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी अभयारण्यातील वनक्षेत्र वणव्यापासून अधिकाधिक सुरक्षित राहण्यास मदत झाली.
नाशिक वनवृत्तातील वन्यजीव विभागाच्या अखत्यारितित असलेल्या कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याचा परिसर पर्यटकांना नेहमीच खुणावतो. वर्षाच्या बारामहिने येथे पर्यटकांचा राबता कायम असतो. यावर्षी कोरोना आजाराचे संकट देशासह राज्यावर आले आहे. यामुळे मागील दोन महिन्यांपासून लॉकडाउन राज्यात घोषित करण्यात आला आहे. तसेच वन्यजीव विभागानेही पर्यटकांसाठी अभयारण्यांचे दरवाजे बंद ठेवले आहेत. यामुळे उन्हाळ्यात पर्यटक या भागात फिरकलेच नाही. भंडारदरा वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय पडवळे, वनपरिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार, सचिन धिंदळे यांनी अभयारण्यक्षेत्रातील गावांमध्ये फिरून जनजागृती करत वनवणवे रोखण्यासाठी लोकसहभाग वाढविणे गरजेचे असल्याचे सांगितले. वनवणव्यांमुळे होणारी अपरिमित हानी स्थानिक लोकांना पटवून दिली. तसेच कृत्रिम वणवे पसरविणे वन कायद्यानुसार गंभीर गुन्हा ठरतो व त्या गुन्ह्यात शिक्षेचे स्वरूपदेखील गंभीर असल्याचे लोकांना समजावून सांगितले. यासाठी ग्रामपरिस्थितीकीय विकास समितीची मदत घेत ग्रामपंचायतींना विश्वासात घेतले. यामुळे स्थानिक आदिवासी गावकऱ्यांनी आपआपल्या शेतात राख भाजताना आवश्यक खबरदारी घेतली. परिणामी अभयारण्य क्षेत्रात जेमतेम पाच ते सहा किरकोळ स्वरूपाच्या वणव्याच्या घटना उन्हाळ्यात घडल्या. गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे यंदा भंडारदरा व राजूर वनपरिक्षेत्रातील अभयारण्य वणव्यांपासून सुरक्षित राहू शकल्याचे पडवळे म्हणाले. प्रत्येक गावागावांमध्ये भेटी देत तेथील लोकांमध्ये वणव्यांपासून होणारे नुकसान याविषयी जागृती करणे, तसेच कृत्रिम वनवे कसे टाळावे, त्यासाठी काय उपाययोजना आवश्यक आहे, याविषयीचे प्रबोधन करण्यावर वनरक्षक बालिका फुंदे, गोविंदा आडळ, संजय गिते, दत्तु भोये, महेंद्र पाटील, राजेंद्र आहेर आदींनी विशेष भर दिला.

गेल्या वर्षी दीड ते दोन एकर क्षेत्र बाधित
मागील वर्षी उन्हाळ्यात भंडारदरा वनपरिक्षेत्रातील अभयारण्यामध्ये सुमारे पंधरा ते वीस ठिकाणी कृत्रिम वनवणव्यांचा भडका उडाला होता. यामुळे अभयारण्याचे सरासरी दोन एकर वनक्षेत्र बाधित झाले होते. यावर्षी मात्र केवळ चार ते पाच ठिकाणी किरकोळ स्वरूपात वणवा पेटल्याचा दावा भंडारदरा वनपरिक्षेत्राच्या अधिका-यांनी केला आहे.

ग्रामपंचायतीला ५ हजारांचे बक्षीस
जे गाव आपल्या शिवारातील वनक्षेत्र वणव्यापासून सुरक्षित ठेवण्यास यशस्वी होईल, त्या गावाच्या ग्रामपंचायतीला वन्यजीव विभागाकडून ५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. यामुळे गावकºयांनी अधिक सकारात्मक विचार करत कृत्रिम वणवे रोखण्याचा प्रयत्न केला.


या गावांना आले यश
पेंडशेत, पांजरे, उडदावणे, शिंगणवाडी, लव्हाळवाडी, रतनवाडी, कोलटेंबे, साम्रद, पेरुंगण, घाटघर या गावांमध्ये जनजागृती केली. या गावांनीदेखील ग्राम परिस्थितीकीय विकास समिती व ग्रामपंचायतीला सहकार्य करत आपआपल्या हद्दीत वनवणवे लागणार नाही, याची दक्षता घेतली.

 

 

Web Title: Kalsubai-Harishchandragad Sanctuary:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.