कळसुबाई -हरिश्चंद्रगड अभयारण्यात पुनवेचा चंद्रप्रकाश पडलाच नाही; बुद्धपौर्णिमेचा मुहूर्त पावसाने हुकविला
By अझहर शेख | Published: May 7, 2023 05:30 PM2023-05-07T17:30:46+5:302023-05-07T17:32:13+5:30
बुद्धपौर्णिमेच्या चांदण्या रात्री नाशिक वन्यजीव विभागाकडून कळसुबाई, हरिश्चंद्रगड, यावल, अनेर डॅम अभयारण्यांमध्ये वन्यप्राणी गणनेचे नियोजन करण्यात आले होते.
नाशिक : वन्यजीव विभागाने कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यामध्ये वन्यप्राणी गणनेसाठी जय्यत तयारी केली होती. भंडारदरा, राजूर या दोन्ही वनपरिक्षेत्रांत एकूण २८ तात्पुरत्या मचाणीही उभारण्यात आल्या होत्या. मात्र, शुक्रवारी (दि. ५) संध्याकाळी झालेल्या जोरदार वादळी गडगडाटी बेमोसमी पावसाच्या हजेरीने वन्यप्राणी गणनेवर पाणी फेरले. ऐनवेळेस वन्यप्राणी गणना रद्द करण्यात आली.
बुद्धपौर्णिमेच्या चांदण्या रात्री नाशिक वन्यजीव विभागाकडून कळसुबाई, हरिश्चंद्रगड, यावल, अनेर डॅम अभयारण्यांमध्ये वन्यप्राणी गणनेचे नियोजन करण्यात आले होते. याबाबत कळसुबाईमधील भंडारदरा, राजूर या वनपरिक्षेत्रातील रतनवाडी, साम्रद तसेच कोथूळ या दोन भागांत वन्यप्राण्यांच्या गणनेसाठी मचाणी उभारणीही पूर्ण करण्यात आली होती. कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात भंडारदरा वनपरिक्षेत्रातील रतनवाडी येथील वाघतळे, घाटगर येथील घाटनदेवी तळे, शिंगणवाडी, पांजरे बेट, उडदावणे या भागात एकूण १२, तर राजूर वनपरिक्षेत्रात एकूण १६ मचाणी उभारण्यात आल्या होत्या.
वन्यप्राणी गणनेसाठी वन्यजीव विभागाचे अधिकारी, कर्मचारीवर्ग सज्ज झाले होते. खासगी पर्यावरणप्रेमी संस्थांसह वन्यजीवप्रेमींकडूनही गणनेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करण्यात आली होती. मात्र, अचानकपणे लहरी निसर्गामुळे अभयारण्यातील वातावरण बदलले. संध्याकाळी ढग दाटून येण्यास सुरुवात झाली आणि विजांच्या कडकडाटासह गडगडाटी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे पुनवेचा चंद्रप्रकाश अभयारण्यात पडू शकला नाही. परिणामी या अभयारण्यात होणारी वन्यप्राणी गणना रद्द करण्याचा निर्णय सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांच्याकडून घेण्यात आला.
निरीक्षणाची संधी हुकली अन् साऱ्यांचाच हिरमोड
बुद्धपौर्णिमेची वाट वन्यजीवप्रेमी वर्षभर आतुरतेने बघत असतात. कारण या चांदण्या रात्रीच्या प्रकाशात वन्यप्राणी पाणवठ्यांवर सहज नजरेस पडतात. वन्यजीव विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह वन्यप्रेमींसाठी ही एकप्रकारची पर्वणीच असते. जंगलात रात्र मचाणीवर बसून जागून काढत वन्यप्राण्यांचा अधिवास व निरीक्षणे नोंदवून घेतली जात असतात. या निरीक्षणावरून वर्षभरात अभयारण्यात वन्यप्राण्यांचा असलेला वावर याविषयीचा अंदाज बांधला जातो. मात्र, ही संधी लहरी निसर्गामुळे हुकल्याने साऱ्यांचाच हिरमोड झाला.