कळवण, सुरगाण्यातील ग्रामपंचायतीचे होणार विभाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 03:45 PM2020-03-01T15:45:57+5:302020-03-01T15:47:33+5:30
कळवण विधानसभा मतदार संघातील कळवण तालुक्यातील पाच व सुरगाणा तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींचे विभाजन करण्यात येणार आहे. यानंतर १४ ग्रामपंचायती नव्याने अस्तित्वात येणार आहेत.
कळवण : विधानसभा मतदार संघातील कळवण तालुक्यातील पाच व सुरगाणा तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींचे विभाजन करण्यात येणार आहे. यानंतर १४ ग्रामपंचायती नव्याने अस्तित्वात येणार आहेत.
जिल्हा परिषदेने प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर तो विभागीय आयुक्तांकडे मंजुरीसाठी दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून त्यांच्यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.
कळवण व सुरगाणा या आदिवासी तालुक्यातील ज्या आदिवासी गावांची लोकसंख्या एक हजाराहून अधिक असून देखील त्या गावांचा ग्रुप ग्रामपंचायतमध्ये समावेश आहे. त्यामुळे आदिवासी गावे विकासापासून वंचित असल्याची ओरड होत होती. या गावातील आदिवासी बांधवानी ग्रामपंचायत विभाजनाची मागणी केली होती. शासन नियमानुसार पात्र असलेल्या गावामध्ये स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात येते. ग्रुप ग्रामपंचायत असेल तर त्यापासून विभक्त होऊन नवीन ग्रामपंचायतीची निर्मिती केली जात असल्यामुळे कळवण व सुरगाणा तालुक्यातील प्रस्तावांना मंजुरी देण्याबाबत आमदार नितीन पवार यांनी नाशिक जिल्हा परिषद प्रशासनाला सूचना केली होती.
कळवण व सुरगाणा या आदिवासी तालुक्यांतील ७ ग्रामपंचायतींचे विभाजन करून नव्याने १४ ग्रामपंचायतींची निर्मिती करण्याच्या प्रस्तावाला जिल्हा परिषदेने मंजुरी दिली आहे. आठ वर्षांनंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात नवीन ग्रामपंचायतींची निर्मिती करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत ग्रामपंचायतींच्या विभाजनाला मंजुरी देण्यात आल्यानंतर हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे.