कळवण तालुका कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 10:08 PM2020-05-27T22:08:05+5:302020-05-27T23:55:23+5:30
कळवण : तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाची तालुका आरोग्य व उपजिल्हा रुग्णालय, तहसील, नगरपंचायत, पंचायत समिती, पोलीस या सर्वच प्रशासकीय यंत्रणांकडून झालेल्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे कळवण शहर व तालुका कोरोनापासून मुक्त झाला असून केवळ एका अहवालामुळे तालुका चर्चेत येऊन माथी कोरोनाचा टिळा लागला होता.
कळवण : तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाची तालुका आरोग्य व उपजिल्हा रुग्णालय, तहसील, नगरपंचायत, पंचायत समिती, पोलीस या सर्वच प्रशासकीय यंत्रणांकडून झालेल्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे कळवण शहर व तालुका कोरोनापासून मुक्त झाला असून केवळ एका अहवालामुळे तालुका चर्चेत येऊन माथी कोरोनाचा टिळा लागला होता. तालुक्यात आढळून आलेल्या ११ वर्षीय बालकात कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसून आली नाही. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ९ मे रोजीच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ११ वर्षीय बालक पूर्णत: ठणठणीत बरे झाले असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर पाटील यांनी सांगितले.
नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार पहिला पेशंट लक्षणे मुक्त असल्याने आणि नवीन रुग्ण तसेच संशयितसुद्धा नसल्यामुळे तालुक्याला मोठा दिलासा मिळाला आहे. कळवण शहरासह तालुका कोरोनामुक्त झाला असल्याच्या वृत्ताला डॉ. पाटील यांनी दुजोरा दिला आहे.
१२ मे रोजी कळवण शहरातील शिवाजीनगर भागात राहणाऱ्या एका अकरा वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता, हा कळवण तालुक्यातील पहिलाच रुग्ण असल्याने प्रशासकीय यंत्रणेसोबत नागरिकही धास्तावले होते. त्यामुळे कळवण शहरातील अंतर्गत सर्वत्र रस्ते बंद करून शिवाजीनगर परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले होते. कळवण शहरात करोना रुग्ण आढळल्यानंतर आमदार नितीन पवार यांच्यासह सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, तहसीलदार बंडू कापसे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत खैरे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने, डॉ. राजेश काटे यांनी प्रशासकीय नियोजन करून प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी, दक्षता घेण्याच्या सूचना, आरोग्य विभागाकडून परिसराचे सर्वेक्षण, रुग्णाच्या नजीकच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी, नगरपंचायत प्रशासनाकडून प्रतिबंधित क्षेत्रात जंतुनाशक फवारणी, परिसर कंटेन्मेंट झोन करून यंत्रणा सतर्क ठेवली होती.
----------------------
नऊ अहवाल निगेटिव्ह आल्याने नागरिकांना दिलासा
दि. १२ मे रोजी कळवणच्या एका मुलाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. या रुग्णाला कुठलीही प्रवास पार्श्वभूमी नसून त्याचे वडील शासकीय सेवेत कार्यरत आहेत. सध्या ते मालेगाव येथे कार्यरत असल्याने खबरदारी म्हणून संपूर्ण कुटुंबाची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे शासकीय यंत्रणा सतर्क झाली होती. शहर व तालुक्यात धाकधूक वाढली असताना रुग्णाच्या नजीकच्या संपर्कातील तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या सर्व नऊ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने कळवणकरांना मोठा दिलासा मिळाला होता.