कळवणचा कांदा परदेशासह परराज्यातही खातोय भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:18 AM2021-09-17T04:18:33+5:302021-09-17T04:18:33+5:30
कळवण (मनोज देवरे) : जिल्ह्यात सर्वाधिक कांद्याचे उत्पादन कळवण तालुक्यात होत असून उन्हाळी हंगामात २३७४४ हेक्टर क्षेत्रात कांदा ...
कळवण (मनोज देवरे) : जिल्ह्यात सर्वाधिक कांद्याचे उत्पादन कळवण तालुक्यात होत असून उन्हाळी हंगामात २३७४४ हेक्टर क्षेत्रात कांदा लागवड होते. कांदा या नगदी पिकातून तालुक्यात बाजार समिती, कांदा उत्पादक अन् व्यापाऱ्यांची कोट्यधीश रुपयांची उलाढाल होते. रंग, आकार, चविष्ट, वजन आणि गुणवत्ता चांगली असल्यामुळे व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला उच्च प्रतीच्या कांद्याला परराज्यात आणि परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे देशांतर्गत विक्रीबरोबर परदेशात निर्यातदेखील होतो. तालुक्यातील पश्चिम भाग हा नैसर्गिक व भौगोलिक दृष्टीने डोंगराचा, मध्यम हलक्या जमिनीचा व अधिक पर्जन्यमानाचा तर पूर्वभाग बहुतांशी कमी उताराच्या, मध्यम व चांगली जमीन असणारा भूभाग आहे. सरासरी पर्जन्यमान ७१९ मिमी इतके असून पश्चिम भागात ११०० ते १२०० मि.मी.पर्यंत पाऊस पडतो. गिरणा व पुनद या मुख्य नद्या असून त्यांच्यावर चणकापूर व अर्जुन सागर (पुनद ) धरण बांधले असून धरणाअंतर्गत कालव्यांना पाणी सोडल्यानंतर विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते. स्व. ए. टी. पवारांनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात सिंचन योजना राबविल्याने पाण्याची सुबत्ता आहे. शेतीचे नवनवीन प्रयोग तालुक्यात होत असल्यामुळे शेती बहरू लागली आहे.
पावसाचे उशिरा होणारे आगमन, ऑगस्ट महिन्यातील पावसाचा खंड, पावसाचे अनियमित वितरण या कारणाने खरीप हंगामातील मुख्य पिकांची उत्पादनात घट होत असून तालुक्यात सुमारे ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर पिकांचे उत्पादन घेतले जाते. भात,ज्वारी, बाजरी, नागली,व मका ही तृणधान्य पिके तर तूर मूग, उडीद ही कडधान्य पिके घेतली जातात. गळीत धान्यात भुईमूग, सोयाबीन, सूर्यफूल, खुरासणी व तीळ ही पिके घेतली जातात. गेल्या दहा वर्षातील खरीप पीक रचनेचा विचार केल्यास ज्वारी, बाजरी, खुरासणी, व तीळ या पिकांच्या क्षेत्रात मोठी घट होऊन त्याएवजी भात, मका, मूग, उडीद, तूर व सोयाबीन या पिकाखालील क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. मका व सोयाबीन हे नगदी पिके म्हणून पुढे आले असून उन्हाळी हंगामात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात होते.
----------------------
पाच महिन्यात १३ लाख ५६ हजार क्विंटलची आवक -
कळवण बाजार समितीच्या कळवण, अभोणा व कनाशी आवारात कांदा विक्रीसाठी जवळच बाजारपेठ उपलब्ध असल्यामुळे पाच महिन्यात १३ लाख ५६ हजार क्विंटल कांद्याची आवक होती. सध्या कांद्याला कमीतकमी हजार रुपये तर जास्तीत जास्त १७४० तर सरासरी १४०० भाव सुरू आहे. शेतकऱ्यांनी कांद्याचा उच्चाकी आणि निच्चाकी भाव अनुभवला असून कांदा पिकातून मोठ्या प्रमाणात अपेक्षा असल्यामुळे शेतकरी कांदा लागवड आणि साठवण करण्यावर भर देतो.
----------------------
कांदा चाळ एक वरदान
कांद्याला मिळणाऱ्या चांगल्या बाजार भावामुळे शेतकऱ्यांनी कांदा चाळींची उभारणी केली असून कृषी विभागाच्या वतीने अनुदान देण्यात येते. उन्हाळ कांद्याचे उत्पादन वाढत असल्याने व गेल्या काही दिवसात चांगल्या बाजारभावामुळे सन २०१६ ते २०२० या दरम्यान तालुक्यात ४८,८१५ मेट्रिक टन क्षमतेच्या २१३७ कांदा चाळीची उभारणी झाली. तालुक्यात अनुदान तत्त्वावरील २८५४ कांदा चाळी असून त्याद्वारे ६४२८५ मेट्रिक टन कांद्याची साठवणूक होते. उन्हाळी कांदा साठवून तो योग्य वेळी बाजारात आणणे केवळ कांदाचाळीमुळे शक्य होते.