झुंजीदरम्यान विहिरीत पडून काळविटाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 11:51 PM2018-03-26T23:51:26+5:302018-03-27T00:19:07+5:30
येथे काळविटांच्या झुंजीत दोघं काळवीट विहिरीत पडल्याने एका काळविटाच्या मानेला गंभीर दुखापत झाल्याने ते मृत झाले, तर दुसऱ्याला जिवंत बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले.
ममदापूर : येथे काळविटांच्या झुंजीत दोघं काळवीट विहिरीत पडल्याने एका काळविटाच्या मानेला गंभीर दुखापत झाल्याने ते मृत झाले, तर दुसऱ्याला जिवंत बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले. येथील शेतकरी रायभान लंबे यांच्या मालकीच्या विहिरीजवळ सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास काळविटांत झुंज झाली. त्यात ते दोन्ही काळवीट साठ फूट खोल विहिरीत पडल्याचे लंबे यांनी बघितले. शेजारील शेतकरी नानासाहेब गुडघे यांच्यासह शेतकºयांना बोलावून वनविभागाला माहिती दिली. वनविभागाचे वनरक्षक ज्ञानेश्वर वाघ, पोपट वाघ, मनोहर दाणे, कचरू सोमासे, अनिल वाघ यांनी लगेचच घटनास्थळी येऊन साठ फूट खोल विहिरीतून दोन्ही काळविटांना वर काढले; परंतु विहीर कोरडी असल्याने एका काळविटाला माणेला मार लागल्याने त्याचा विहिरीतच मृत्यू झाला, तर एक काळविटाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. दोन्ही काळवीट साधारण तीन वर्षे वयाचे असून, झुंज चालू असताना विहिरीचा अंदाज न आल्याने दोन्ही काळवीट विहिरीत पडले. जिवंत काळविटाला सोडून देण्यात आले, तर मृत्यू झालेल्या काळविटाला दफन करण्यात आले. दरवर्षी उन्हाळ्यात कधी विहिरीत पडून कधी कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी होऊन तर कधी रस्ता ओलंडताना पाच ते सहा हरिणांना जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे वनविभागाने ममदापूर संवर्धन राखीवमध्ये हरिणाच्या चारा, पाणी व निवाºयाची व्यवस्था करावी, अशा मागणी परिसरातून होत आहे.