कळवण नगरपंचायतीचा कारभार ठप्प
By admin | Published: January 17, 2016 09:51 PM2016-01-17T21:51:12+5:302016-01-17T21:52:47+5:30
समस्यांचा डोंगर : मुख्याधिकाऱ्याअभावी प्रशासन ढेपाळले; नागरिकांत संतप्त प्रतिक्रिया
कळवण : नव्यानेच स्थापन झालेल्या कळवण नगरपंचायतीमुळे शहरातील समस्या मार्गी लागतील, अशी अपेक्षा होती. मात्र, नऊ महिन्यांपासून मुख्याधिकाऱ्याअभावी प्रशासन पूर्णत: ढेपाळले आहे. पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने जनतेची कामे कशी करावी, असा प्रश्न नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक यांना सतावत आहे. याप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच लक्ष घालून मुख्याधिकाऱ्यासह प्रमुख शासकीय यंत्रणेची तत्काळ नियुक्ती करावी, अशी मागणी कळवणच्या नगराध्यक्ष सुनीता पगार व उपनगराध्यक्ष अनिता महाजन यांनी केली आहे.
वसाका कार्यस्थळावर सोमवारी (दि. १८) होणाऱ्या गळीत हंगामाच्या उद्घाटन कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार राज्यमंत्री दादा भुसे येणार असून, गटनेते कौतिक पगार यांच्या नेतृत्वाखाली कळवण नगरपंचायतीचे शिष्टमंडळ त्यांची भेट घेऊन निवेदन देणार आहे.
नऊ महिन्यांपूर्वी येथील ग्रामपंचायत बरखास्त करून नगरपंचायतीची स्थापना करण्यात आली. नगरपंचायतीला ग्रामपंचायतीपेक्षा जादा विकास निधी येत असल्याने मूलभूत समस्या मार्गी लागतील, अशी आशा नागरिकांना होती. नगरपंचायतीची निवडणूक घोषित होताच नागरिकांनी निवडणुकीत हिरिरीने भाग घेतला. राष्ट्रवादी कॉँग्रेसची सत्ता आली. त्याला आता दोन ते तीन महिने झाले. मात्र, नगरपंचायतीच्या कारभारालाच पूर्ण खीळ बसली आहे.
गेल्या दोन महिन्यांच्या काळात केवळ पदाधिकारी व सदस्यांच्या पदग्रहण कार्यक्रमाव्यतिरिक्त सदस्यांच्या केवळ सभा होतात. मात्र मुख्याधिकारी नसल्याने प्रशासकीय कामाची अंमलबजावणी करता येत नाही. मुख्याधिकाऱ्याविना शहरातील प्रशासन ठप्प झाले आहे. ग्रामपंचायत काळात मंजूर कामे शहरात सुरू आहे. अनेक नवीन बांधकामे सुरू करण्यासाठी नागरिक नगरपंचायत कार्यालयात चकरा मारतात. परंतु परवानगी द्यायलाच कुणी अधिकारी नाही. शहरातील पाणीपुरवठा, दिवाबत्ती, रस्ते आदि प्रभागातील कामांची मागणी नगरसेवकांकडून होत आहे. नगरपंचायत कर्मचाऱ्यांवर कामकाज करण्याचे नियंत्रण आहे. नळ योजनेच्या व दिवाबत्ती दुरुस्तीसाठीचा खर्च द्यायचा कुणी, हा प्रश्न आहे, त्यामुळे समस्या वाढत आहे. कळवणकरांच्या आशा व अपेक्षा उंचावल्या आहेत. त्या पूर्ण करण्याची नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेते, नगरसेवक यांची मानसिकता आहे. परंतु मुख्याधिकारी नसल्याने कामे ठप्प आहेत. याप्रश्नी मुख्यमंत्री फडणवीस यांनीच लक्ष घालून मुख्याधिकाऱ्यासह प्रमुख शासकीय यंत्रणेची तत्काळ नियुक्ती करावी, अशी मागणी कळवणच्या नगराध्यक्ष सुनीता पगार, उपनगराध्यक्ष अनिता महाजन, गटनेते कौतिक पगार, नगरसेवकांनी केली आहे.(वार्ताहर)