येवला मतदारसंघातील माजी आमदार कल्याणराव पाटील यांची घरवापसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 04:54 PM2019-08-02T16:54:56+5:302019-08-02T16:55:19+5:30
भाजपातून शिवसेनेत : मातोश्रीवर बांधले शिवबंधन
लासलगाव : विविध पक्षांतून भाजपात मोठ्या प्रमाणावर प्रवेश होत असताना येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी मात्र भाजपाला सोडचिठ्ठी देत स्वगृही म्हणजे शिवसेनेत घरवापसी केली आहे. शुक्रवारी (दि.२) मुंबईत मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पाटील यांनी शिवबंधन बांधले. दरम्यान, पाटील यांच्या शिवसेना प्रवेशाने इच्छुकांच्या भु्रकुट्या उंचावल्या आहेत.
दीड वर्षापूर्वी कोल्हापूर येथे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. परंतु भाजपात ते कधी सक्रीय झाल्याचे दिसून आले नाही. निफाड-येवला मतदार संघात दोन टर्म आमदारकी भूषविणाऱ्या कल्याणराव पाटील यांनी शिवसेनेकडून प्रतिनिधीत्व केले होते. आमदार म्हणुन माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली होती. मागील विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी विकासाच्या मुद्यावर राष्टÑवादीचे उमेदवार छगन भुजबळ यांना पाठिंबा दर्शविला होता. केंद्र व राज्यातील बदलती समिकरणे पाहून त्यांनी दीड वर्षापूर्वीच भाजपात प्रवेश केला परंतु, भाजपात ते कुठे सक्रीय झाल्याचे दिसून आले नाही. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये ठिकठिकाणच्या नेत्यांची मेगाभरती सुरू असताना कल्याणराव पाटील यांनी मात्र, भाजपला रामराम ठोकत पुन्हा शिवसेनेत स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, शुक्रवारी मातोश्रीवर पाटील यांनी पुन्हा भगवा हाती घेतला. याप्रसंगी खासदार संजय राऊत, नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, जिल्हाप्रमुख सुनील पाटील, पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे, बाळासाहेब टापसे आदी उपस्थित होते. दरम्यान, भाजपामध्ये जोरदार इनकमिंग सुरू असताना पाटील यांनी भाजपातून शिवसेनेत परतण्याचा निर्णय घेतल्याने भाजपातील स्थानिक नेते-कार्यकर्तेही चक्रावले आहेत.