नाशिकरोड रेल्वेस्थानकावरील हमालांचे कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 01:30 AM2018-03-01T01:30:19+5:302018-03-01T01:30:19+5:30
रेल्वेस्थानकावरील हमालांना पदोन्नती देऊन रेल्वेच्या ग्रुप डी मध्ये नोकरीत सामावून घ्यावे आदी मागण्यांसाठी हमालांनी बुधवारी कामबंद आंदोलन पुकारले. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली होती.
नाशिकरोड : रेल्वेस्थानकावरील हमालांना पदोन्नती देऊन रेल्वेच्या ग्रुप डी मध्ये नोकरीत सामावून घ्यावे आदी मागण्यांसाठी हमालांनी बुधवारी कामबंद आंदोलन पुकारले. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली होती. सेंट्रल रेल्वे लायसन्स पोर्टर (हमाल) यांच्या वतीने रेल्वे स्थानकावरील अधिकृत हमालांना पदोन्नती देऊन रेल्वेच्या ग्रुप डी मध्ये नोकरीत सामावून घ्यावे, २००८ मधील अनफिट हमालांना ग्रुप डी च्या अन्य पदावर नियुक्त करण्यात यावे, ज्येष्ठ हमालांना ते आहे त्याच ठिकाणी ग्रुप डी मध्ये समाविष्ट करून घ्यावे, ज्येष्ठ हमालांना पेन्शन देण्यात यावी, हमालांना त्यांच्या कार्यरत असलेल्या स्थानकावर नियुक्त करून घेण्यात यावे, या मागण्यांसाठी बुधवारी दिवसभर नाशिकरोड रेल्वेस्थानकावर हमालांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारावर हमाल कामबंद आंदोलन पुकारून बसले होते. आंदोलनामध्ये किसन चौले, गोरखनाथ वाघ, प्रकाश बोडके, जगन हारळे, विलास जाधव, मच्छिंद्र ढोले, समाधान पाटील, शरद बिन्नर, रामदास काकड, संतोष बरके, संजय काळे, राजेंद्र ढोणे, काशीनाथ मानकर, गोकुळ सानप, पांडुरंग मानकर, प्रकाश मानकर, नवनाथ वडाळकर आदींसह स्थानकांवरील २७ हमाल सहभागी झाले होते.
रेल्वेस्थानकाचे प्रबंधक एस.बी. सक्सेना यांना निवेदन देण्यात आले. हमालाच्या कामबंद आंदोलनामुळे रेल्वेस्थानकात येणाºया व जाणाºया प्रवाशांना स्वत:चे सामान उचलण्याची वेळ आल्याने प्रवाशांची गैरसोय झाली होती.