कामायनी, पवनला लवकर लासलगावी थांबा
By admin | Published: August 21, 2016 10:16 PM2016-08-21T22:16:59+5:302016-08-21T22:32:02+5:30
आश्वासन : चव्हाण यांचे राज्यमंत्र्यांना निवेदन
लासलगाव : लासलगाव रेल्वेस्थानकावर कामायनी व पवन एक्स्प्रेसला थांबा मिळावा यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या समवेत चर्चा करून तातडीने सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट आश्वासन केंद्रीय रेल्वे व संचार राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी नाशिकरोड येथे रविवारी दुपारी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या समवेत लासलगावचे ग्रामपंचायत सदस्य डी. के. जगताप व शिवा सुरासे यांनी भेट घेऊन निवेदन सादर केल्यावर दिले.
खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी लासलगाव येथील रेल्वे थांबा मिळावा यासाठी होत असलेल्या
पाठपुराव्यामुळे तातडीने निर्णय घ्यावा, अशी माहिती मंत्री मनोज सिन्हा यांना दिली. या निवेदनात लासलगावला या गाड्यांच्या थांब्याची मागणी बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित आहे. लासलगावहून रेल्वेने ये-जा करणारे विद्यार्थी, व्यापारी व नोकरदार यांचे मोठे प्रमाण आहे.
नाशिकहून लासलगावकडे येण्यासाठी दुपारच्या साडेअकरा वाजेच्या पॅसेंजरनंतर सहा तासानंतर सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी गोदावरी एक्स्प्रेस ही गाडी आहे.
दोन्ही गाड्यांदरम्यान सहा तासांचा अवधी असल्याने व्यापारी व प्रामुख्याने विद्यार्थ्यांची कुचंबणा होते. त्यांचे बहुतांशी सकाळी शैक्षणिक तास असल्याने ते दुपारी मोकळे होतात. त्यांच्याकडे प्रवासासाठी रेल्वे पास असल्याने त्यांना रेल्वेस्थानकावर बसण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. त्यामुळे या गाड्यांना थांबा मिळाल्यास त्यांचा वेळ वाचणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे. (वार्ताहर)