कमोदनगर उद्यानाची दुरवस्था ; आबालवृद्धांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 01:08 AM2019-04-30T01:08:15+5:302019-04-30T01:08:47+5:30
प्रभाग क्र मांक २३ मधील कमोदनगर येथील उद्यानाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे आबालवृद्धांची गैरसोय होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
इंदिरानगर : प्रभाग क्र मांक २३ मधील कमोदनगर येथील उद्यानाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे आबालवृद्धांची गैरसोय होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
सुमारे दहा वर्षांपूर्वी कमोदनगर परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार महापालिकेच्या वतीने उद्यानाची निर्मिती करण्यात आली होती. यामध्ये उद्यानांमध्ये लॉन्स, खेळणी आणि जॉगिंग ट्रॅक करण्यात आला होता. त्यामुळे सकाळी व सायंकाळी परिसरातील बालगोपाळ व नागरिकांची वर्दळ असायची, परंतु उद्यान विभागाकडून कोणत्या प्रकारची देखभाल होत नसल्याने लॉन्स सुकून गेले आणि खेळण्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे उद्यानाला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे बालगोपाळांचा आणि नागरिकांचा हिरमोड होत
आहे. उद्यान विभागाच्या गलथान कारभारामुळे उद्याची दयनीय अवस्था झाल्याचा आरोप नागरिकांनी केले आहे.
इंदिरानगर परिसरामध्ये अनेक नववसाहती असून नागरिकांकडून मुलभूत सोयीसुविधांची मागणी करण्यात येत आहे. विशेषत: अनेक भागात मुलांना खेळण्यासाठी उद्याने नाहीत. सध्या उन्हाळ्याची सुट्टी असल्याने उद्याने नसल्याने मुलांना सायंकाळच्या वेळी खेळण्यासाठी जागा नाही. काही उद्यानांमध्ये खेळणी तुटली असून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. उद्यानांमध्ये अद्ययावत खेळणी उपलब्ध करून द्यावी यासंबंधी महापालिकेकडे वारंवार निवेदन देवूनही अद्यापपर्यंत कार्यवाही झालेली नाही. लोकप्रतिनिधींनी याबाबत लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.