कनाशीत गटारीची दुरवस्था
By admin | Published: September 11, 2014 09:39 PM2014-09-11T21:39:54+5:302014-09-12T00:09:39+5:30
कनाशीत गटारीची दुरवस्था
कनाशी : येथील गटारीचे पाणी नागरिकांच्या घरात शिरत आहे. त्यामुळे नागरिकाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे
सार्वजनिक बांधकाम विभागाने पाच वर्षांपूवी गटारीचे बांधकाम केले. पंरतु काम निकृष्ठ केल्यामुळे गटारींची दयनीय अवस्था झाली आहे. कनाशी - हातगड व कनाशी-पिपळा रस्त्यावर सीमेंट काँक्रीटच्या गटारीचे बांधकाम केले. पाच वर्षांत साफसफाई केली नसल्यामुळे गटारी पूर्णपणे गाळ व मातीने भरल्या आहेत. गटारीतून वाहणारे पाणी पावसाळ्यात रस्त्यावरून वाहत असते. त्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरत आहे. मागच्या वर्षी किसान कृषी सेवा या रासायनिक खताच्या दुकानात पाणी शिरल्यामुळे खताच्या गोणीचे नुकसान झाले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे काणाडोळा केला आहे. गटारींची जेसीबी मशीनच्या साहाय्याने सफाई गरजेची आहे. वर्षभर गटारी साफ होत नसल्यामुळे डासांचे साम्राज्य वाढत आहे. त्यामुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळत आहे. सदर विभाग नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. बांधकाम विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिक करत आहेत. (वार्ताहर)