कन्हैया कुमारची सभा होणारच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:48 AM2017-10-27T00:48:46+5:302017-10-27T00:48:53+5:30
आॅल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे अध्यक्ष कन्हैया कुमार यांची सभा शहरात होणारच, असा निर्धार ‘संविधान जागर’च्या वतीने करण्यात आला आहे.
नाशिक : आॅल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे अध्यक्ष कन्हैया कुमार यांची सभा शहरात होणारच, असा निर्धार ‘संविधान जागर’च्या वतीने करण्यात आला आहे. सभेच्या परवानगीचा अर्ज पोलीस आयुक्तालयासह मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
गोदाकाठावरील यशवंतराव महाराज पटांगणावर सभेची परवानगी पोलिसांनी नाकारल्यानंतर आता मुंबई नाका येथील तुपसाखरे लॉन्स हे सभेचे ठिकाण निश्चित करण्यात आल्याची माहिती संयोजकांकडून देण्यात आली आहे. याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांच्याकडे परवानगी अर्जही देण्यात आला आहे. सभेसाठी अंदाजे पंधरा हजार विद्यार्थी उपस्थित राहणार असल्याचे संयोजकांकडून सांगण्यात आल्याचे नंदवाळकर यांनी सांगितले. त्यामुळे संयोजकांनी निश्चित केलेले मुंबई नाका येथील तुपसाखरे लॉन्स हे ठिकाण सभेसाठी अपुरे पडणार असल्याची कल्पना पोलिसांकडून देण्यात आली आहे. यासंदर्भात संयोजकांना पोलीस प्रशासनाच्या वतीने नोटीस देऊन सभेसाठी आलेल्या नागरिकांची कुठल्याही प्रकारे झालेल्या गैरसोयीबाबत संयोजक संघटना जबाबदार राहणार असल्याचे त्यामध्ये नमूद करण्यात येणार असल्याचे नंदवाळकर यांनी सांगितले. सभेसाठी नेहमीप्रमाणे पोलीस ठाण्याचा बंदोबस्त पुरविला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ‘जेएनयू’च्या आंदोलनापासून कन्हैया प्रकाशझोतात आले. भारतीय विद्यार्थ्यांच्या समस्या मांडण्यासाठी त्यांनी फेडरेशनची स्थापना केली. याअंतर्गत शहरातील पुरोगामी विचारांच्या सहा संघटनांनी एकत्र येऊन कन्हैया कुमार यांची सभा शहरात आयोजित केली आहे.