श्रावण मासातही कपालेश्वर मंदिर बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2021 07:01 PM2021-08-07T19:01:00+5:302021-08-07T19:04:28+5:30
नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सोमवारपासून सुरू होत असलेल्या श्रावण मासातही कपालेश्वर मंदिर दर्शनासाठी बंद राहणार असल्याने यंदाही भाविकांना श्रावणात दर्शनापासून मुकावे लागणार आहे. मंदिर परिसरात होणारी गर्दी टाळण्यासाठी मंदिराकडे येणारे रस्ते भाविकांसाठी बंद ठेवण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. मात्र काेरोनाचे नियम पाहता, मुख्य मंदिरात मंदिरातील पुजारी व गुरवांना श्रावण महिन्यात नित्यनियमाने पूजन करण्यास मुभा देण्यात आली आहे.

यासंदर्भात पंचवटी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी मंदिर पुजारी व विश्वस्तांची बैठक घेऊन भाविकांसाठी मंदिर बंद ठेवण्याबाबत सूचना दिल्या आहेत. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाने नियम शिथिल केले आहेत. त्यातच श्रावण महिना सुरू होत असल्याने देवदेवतांची मंदिरे भाविकांना देवदर्शनासाठी खुली करावी, अशी मागणी भाविक, पुजारी आणि साधू-महंतांनी केली होती. श्रावण महिन्यात भाविक विविध पूजाविधी, अभिषेकपूजन करत असल्याने दरवर्षी भाविकांची महादेव मंदिरात गर्दी व्हायची, मात्र यंदा सलग दुसऱ्या वर्षीदेखील कोरोना सावट असल्याने प्रशासनाने खबरदारी म्हणून सर्वच मठ, मंदिरे बंद ठेवण्याच्या मंदिर प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. त्यानुसार यंदाही श्रावण महिन्यात मठ, मंदिरे बंद राहणार असल्याने भाविकांना लांबून देवदर्शन घ्यावे लागणार आहे.
येत्या सोमवारपासून श्रावण महिना सुरू होणार असून, शासनाने कोरोना खबरदारी म्हणून मंदिरे सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही, तरीदेखील दर सोमवारी व शनिवारी शेकडो भाविक कपालेश्वर मंदिराच्या बाहेर दर्शनासाठी गर्दी करतात. त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेडिंग केले जाणार आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी सांगितले