कपालेश्वर मंदिर तीन दिवस भाविकांसाठी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 10:37 PM2021-03-04T22:37:44+5:302021-03-05T00:47:14+5:30
पंचवटी : आगामी आठवड्यात महाशिवरात्री उत्सव असल्याने गंगाघाटावरील श्रीकपालेश्वर महादेव मंदिरात हजारो शिवभक्तांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने सध्याचे कोरोना संसर्ग वातावरण लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने बुधवार (दि. १०) ते शुक्रवार (दि.१२) असे सलग तीन दिवस मंदिरात भाविकांना दर्शनासाठी मनाई केली आहे.

गंगाघाटावर कपालेश्वर मंदिर असून दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी हजारो शिवभक्त मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासून गर्दी करतात. संपूर्ण देशभरात गेल्या वर्षी कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. संसर्ग रोखण्यासाठी शासनाने गेल्या वर्षी अनेक दिवस सर्वच मंदिरे तसेच धार्मिक स्थळ बंद ठेवली होती. काही दिवसांनी संसर्ग कमी झाल्याने शासनाने नियम व अटीशर्ती व मंदिरे उघडण्यास परवानगी दिली. मंदिरे खुली होताच शेकडो भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी पूर्वीप्रमाणे गर्दी केली असल्याचे चित्र दिसून येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात पुन्हा रुग्ण वाढल्याने तसेच गर्दीच्या ठिकाणी संसर्ग वाढण्याची दाट शक्यता असल्याने प्रशासनाने खबरदारी म्हणून सलग तीन दिवस भाविकांना मंदिरात दर्शनासाठी मनाई केली आहे. त्यानुसार बुधवार, गुरुवार व शुक्रवार हे तीन दिवस कपालेश्वर मंदिर खुले असले तरी भाविकांना मुख्य मंदिरात दर्शनासाठी जाता येणार नाही.
गुरुवारी महाशिवरात्रीला मंदिरातील मोजक्या पुजारी, गुरव वर्गाच्या उपस्थितीत कोरोना नियम पालन करून विविध धार्मिक कार्यक्रम पार पाडावे, अशा सूचना पंचवटी पोलीस ठाण्यातर्फे लेखी स्वरूपात देण्यात आल्या आहेत. महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची कपालेश्वर मंदिरात गर्दी होऊन संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने मंदिरात भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी कपालेश्वर मंदिर विश्वस्त गुरव तसेच पुजाऱ्यांची बैठक घेऊन पोलीस प्रशासन सूचना करणार आहे.