कपालेश्वराच्या चांदीच्या मुखवट्याची मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 01:30 AM2018-08-21T01:30:29+5:302018-08-21T01:31:01+5:30
श्रावण मासानिमित्त पंचवटीतील शिवमंदिरात दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने रामकुंडावरील श्री कपालेश्वर महादेव मंदिर तसेच जुना आडगाव नाका येथील श्रीकृष्णतीर्थ आश्रमात सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.
पंचवटी : श्रावण मासानिमित्त पंचवटीतील शिवमंदिरात दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने रामकुंडावरील श्री कपालेश्वर महादेव मंदिर तसेच जुना आडगाव नाका येथील श्रीकृष्णतीर्थ आश्रमात सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. कपालेश्वर मंदिरातून सायंकाळी पंचमुखी चांदीच्या मुखवट्याची पालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पहाटे भाविकांसाठी श्री कपालेश्वर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आल्यानंतर सकाळी महादेवाच्या पिंडीला रुद्राभिषेक करण्यात आला. मंदिरातील पुजारी तसेच ब्रह्मवृंदांच्या हस्ते महादेवाच्या पिंडीचे पूजन व महाआरती करण्यात आली. भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. मंदिरात येणाºया भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून दक्षिण दरवाजाने प्रवेश देण्यात येऊन उत्तर दरवाजाने बाहेर निघण्याची व्यवस्था केली होती. श्रावण मासानिमित्ताने संपूर्ण मंदिर परिसर व मंदिराच्या गाभाºयात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सायंकाळी कपालेश्वर मंदिरातून महादेवाच्या पंचमुखी मुखवट्याची सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. फुलांनी सजवलेल्या पालखीत पंचमुखी मुखवटा ठेवण्यात आला होता. कपालेश्वर मंदिरातून पालखी अंबिका चौक, मालवीय चौक, शनि चौक, काळाराम मंदिर, सरदार चौक, गंगाघाट, साईबाबा मंदिर परिसरातून काढण्यात येऊन रामकुंडावर पूजन आरती करण्यात आल्यानंतर कपालेश्वर मंदिरात महाआरतीने पालखीचा समारोप करण्यात आला. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन सकाळी ते रात्री उशिरापावेतो मंदिराला प्रदक्षिणा घालण्यास मनाई करण्यात आली होती. दर्शनासाठी येणारे भाविक महादेवाचा गजर करत असल्याने कपालेश्वर मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. जुना आडगाव नाका येथील श्रीकृष्णतीर्थ आश्रम विश्वनाथ महादेव मंदिरात श्रावणनिमित्त पूर्ण महिनाभर सव्वालाख मातीचे पार्थिव शिवलिंग तयार केले जात असून, रामतीर्थ महाराज यांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत.
मातुलेश्वर मंदिर
मातोरी येथील मातुलेश्वर महादेव मंदिरात दुसºया श्रावण सोमवारनिमित्त दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती. पंचक्रोशीतील ऐतिहासिक वारसा लाभलेले एकमेव मंदिर असून, गावातील व परिसरातील मंडळींची सकाळ ही मातुलेश्वराच्या दर्शनानेच होते. मंदिरात दररोज शिवभक्तांकडून जनार्दन स्वामी व शिवआरती केली जाते तर शिव पिंडीवर रामकुंडावरील पाणी वर्षभर सोडण्यात येते. मंदिराची रचना पुरातन असून, श्रावण मासानिमित्त मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.