करंजाळी महाविद्यालयाची नॅक समितीकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 01:01 PM2018-10-23T13:01:51+5:302018-10-23T13:02:36+5:30
पेठ -करंजाळी येथील सह्याद्री शिक्षण मंडळाच्या महंत जमनादास महाराज कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या मुल्यांकनासाठी नॅकच्या त्रिसदस्यीय समितीने भेट दिली.
पेठ -करंजाळी येथील सह्याद्री शिक्षण मंडळाच्या महंत जमनादास महाराज कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या मुल्यांकनासाठी नॅकच्या त्रिसदस्यीय समितीने भेट दिली. या समितीने दोन दिवसात विविध प्रयोगशाळा व विभागांसह संपूर्ण परिसराची पाहणी केली.या पाहणीतून त्रिसदस्यीय समितीने महाविद्यालयाच्या शैक्षणिक विकासाची दखल घेत कौतुक केले आहे.यूजीसीच्या निर्देशानुसार महाविद्यालयाच्या मानांकनासाठी नॅकच्या त्रिसदस्यीय समितीची निवड करण्यात आली होती. नॅकच्या समितीत कर्नाटक महिला विद्यापीठाच्या माजी कुलगुरु डॉ. मिना चंदावरकर तथा सौराष्ट्र विद्यापीठाचे ख्यातनाम प्राध्यापक डॉ. कमल मेहता तर तामिळनाडू च्या ए. एन .जे.ए. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. पांडिया राजन यांचा समावेश होता. या समितीने महाविद्यालयास भेट दिली. यावेळी महाविद्यालयाच्या कलापथकातील विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करत सदस्यांचे स्वागत केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर . वाय. बोरसे , संस्थेचे सचिव पद्माकर गवळी, नॅक सुकाणू समिती समन्वयक प्रा. डॉ. महेंद्र शिंदे यांनी समितीशी चर्चा करून विविध विभागांसह परिसराची माहिती दिली. समितीसोबत प्राचार्यांनी सर्वप्रथम सादरीकरण केले त्यानंतर त्रिसदस्यीय समतिीपुढे रसायनशास्र, वनस्पतीशास्र, पदार्थविज्ञान, प्राणीशास्त्र, मराठी, इतिहास, अर्थशास्र, वाणिज्य विभागांच्या विभागप्रमुखांमार्फत सादरीकरण करण्यात आले. या समितीने महाविद्यालयातील सर्व विभागांना तसेच प्रयोगशाळेंना भेट दिली. प्रयोगशाळेतील विविध साधनांचे निरीक्षण करून समाधान व्यक्त केले. याशिवाय विविध वर्गांसह शिक्षक दालनास भेटी दिल्या. दुपारच्या चहापानादरम्यान विद्यापीठ (कुलगुरू) प्रतिनिधी डॉ. दिनेश नाईक, तथा संस्थेचे अध्यक्ष आमदार नरहरी झरिवाळ यांसोबत चर्चा केली. यानंतर सदस्यांनी विद्यमान विद्यार्थी, माजी विद्यार्थी, तसेच पालकांसोबत स्वतंत्र बैठक घेतली. यावेळी उपस्थितांशी महाविद्यालयातील त्याच्या अनुभव व अपेक्षांबाबत चर्चा केली. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांशी चर्चा करून कागदपत्रांची पाहणी केली. यानंतर समितीने विविध पायाभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केल. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. आर . वाय. बोरसे यांनी केले. समिती प्रमुख डॉ. मिना चंदावरकर यांनी गुणवत्तापूर्वक शैक्षणिक सेवा पुरवित असताना आपण आपल्या राष्ट्रउभारणीच्या कामात मोठे योगदान देत आहात व ते सातत्यपूर्ण देत राहाल अशी अपेक्षा व्यक्त करून नॅकचा सीलबंद अहवाल प्राचार्य तथा आयक्यूएसी समन्वयक यांच्या हाती सोपवला. डॉ. स्मिता चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.आभार प्रा. डॉ. महेंद्र शिंदे यांनी मानले.