कर्मयोगीनगरात नाल्यावरील अनधिकृत भिंतीने पावसाचे पाणी शिरते घरात ; नागरिकांचा तीव्र संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 05:18 PM2020-06-22T17:18:13+5:302020-06-22T17:24:09+5:30
कर्मयोगीनगर भागात असलेल्या नैसर्गिक नाल्याचे पाणी इतरत्र वळवून या नाल्याच्या आतमध्ये संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. अनधिकृत भिंतीमुळे नाल्याची लांबी कमी झाली असून, यामुळे येथील पावसाचे पाणी तसेच ड्रेनेजचे पाणी परिसरातील नागरिकांच्या घरात शिरत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
नाशिक : सिकडो येथील प्रभाग क्र मांक २४ मधील कर्मयोगीनगर भागात असलेल्या नैसर्गिक नाल्याचे पाणी इतरत्र वळवून या नाल्याच्या आतमध्ये संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. अनधिकृत भिंतीमुळे नाल्याची लांबी कमी झाली असून, यामुळे येथील पावसाचे पाणी तसेच ड्रेनेजचे पाणी परिसरातील नागरिकांच्या घरात शिरत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. याबाबत सोमवारी (दि.२२) माजी आमदार नितीन भोसले यांनी सदर नाल्याची पाहणी करून महापालिकेने अनधिकृत भिंत त्वरित तोडून त्याची लांबी वाढून संरक्षण भिंत उभारण्यात यावी अन्यथा परिसरातील नागरिकांना बरोबर घेत सदर संरक्षक भिंत तोडण्यात येईल, असा इशारा ही भोसले यांनी दिला आहे.
कर्मयोगीनगर या ठिकाणी नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमण झाल्याने नाल्याची रुंदी कमी झाली असून, ती त्वरित वाढविण्यात यावी यासाठी महापालिकेला वारंवार कळविले आहे. गेल्यावर्षी स्वरक्षण भिंतीचे काम सुरू असताना ही महापालिकेत कर्मयोगीनगर येथे कर्मयोगीनगर को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या वतीने निवेदने दिले आहे. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे संरक्षण भिंत नाल्यामध्ये उभारल्याने नाला अरुंद होऊन नाल्यातील वाहणारे पाणी संपूर्ण बाहेर येऊन कर्मयोगीनगर भागात राहणाऱ्या परिसरातील नागरिकांच्या घरात शिरले. तसेच या नाल्यांमध्ये ड्रेनेज मिश्रित पाणीही सोडले असल्याने पावसात नैसर्गिक पावसाचे पाणी तसेच ड्रेनेज पाणीदेखील परिसरातील नागरिकांच्या घरात शिरत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
महापालिकेने याबाबत दक्षता घेऊन नाल्यात उभारण्यात आलेली अनधिकृत भिंत त्वरित तोडून त्याची रुंदी वाढविण्यात यावी अन्यथा सोसायटीच्या नागरिकांना बरोबर घेत जेसीबी यंत्राच्या माध्यमातून भिंत तोडण्यात येईल, असे भोसले यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे.