नाशकात कर्नाटक बँकेला काळे फासले, कन्नडगींना जशास तसे उत्तर देणार
By नामदेव भोर | Published: December 7, 2022 01:51 PM2022-12-07T13:51:08+5:302022-12-07T13:51:36+5:30
कर्नाटकात घुसून कन्नडीगांना धडा शिकवू : स्वराज्य संघटनेचा कर्नाटक सरकारला इशारा
नामदेव भोर
नाशिक : महाराष्ट्रातील वाहनांची कन्नडीगांनी केलेली तोडफोड निषेधार्ह असून कर्नाटक सरकारने हा प्रायोजित उध्वंस तात्काळ थांबवावा अन्यथा शिवरायांचा महाराष्ट्र अन्यायाचा वचपा काढून जशास तसे उत्तर देण्यास समर्थ आहे, असा खरमरीत इशारा देत स्वराज्य संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि.७) नाशिकमधीलकर्नाटकबँकेच्या फलकाला काळे फासले.
महाराष्ट्र - कर्नाटक सीमा वादाने हिंसक वळण घेतल्यानंतर नाशिकमध्येही या घटनेचे पडसाद उमटले आहेत. महाराष्ट्र - कर्नाटक पारंपारिक सीमा वाद जैसे थे असतांना सोलापूर, सांगली या महाराष्ट्रातील जिल्ह्यात कर्नाटक सरकार पाय पसरण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या योजत असल्याने हा मुद्दा आणखी संवेदनशील बनला आहे. कर्नाटक सरकारने कन्नडी जनतेला चिथावणी मिळेल अशी भूमिका घेतल्याने कन्नडी समुदाय महाराष्ट्रातील वाहने निवडून दगडफेक करीत असल्याच्या घटना घडल्या असून बेळगावमधील हिरे बागेवाडी टोल नाक्याजवळ कन्नड संघटनांकडून महाराष्ट्रातील ट्रकसह इतर वाहनांवर दगडफेक केल्यानंतर महाराष्ट्रातही संतापाची लाट उसळली आहे. त्याचे पडसाद बुधवारी नाशिकमध्येही उमटताना दिसून आले.
नाशिकमध्ये स्वराज्य संघटनेने आक्रमक भूमिका घेत संघटनेचे प्रदेश प्रवक्ते करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारच्या महाराष्ट्र द्वेषी भूमिकेचा तीव्र शब्दात निषेध करीत घोषणाबाजी केली. तसेच कॅनडा कॉर्नर भागातील कर्नाटक बँकेच्या कार्यालयावर हल्लाबोल करीत बँकेच्या नाम फलकाला काळे फासून कर्नाटक सरकारविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या. या आंदोलनात स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते करण गायकर यांच्यासह संघटनेचे निमंत्रक आशिष हिरे, प्रमोद जाधव सुभाष गायकर, भारत पिंगळे, सागर जाधव, वैभव दळवी, शुभम देशमुख, दिनेश नरवडे, ज्ञानेश्वर कोतकर, किरण डोके, अर्जुन पाटील, संजय तुपलोंढे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
छत्रपती शिवरायांचे चित्र असलेल्या वाहनांची कन्नडीगांनी केलेली तोडफोड निषेधार्ह आहे. महाराष्ट्रात त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. महाराष्ट्राची अस्मिता जपणं हे प्रत्येक महाराष्ट्रातील नागरिकाचे कर्तव्य आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेवर जर कोणी घाला घालीत असेल तर यानंतर त्याला जशास तसे उत्तर देऊन प्रत्युत्तर दिले जाईल. स्वराज्य संघटना कर्नाटकची एकही गाडी महाराष्ट्रात येऊ देणार नाही. कन्नडीगांना कोणतेही धंदे व्यवसाय महाराष्ट्रात करू देणार नाही. प्रसंगी स्वराज्याचे मावळे कर्नाटकात घुसून धडा शिकवतील.
-करण गायकर, प्रदेश प्रवक्ता, स्वराज्य संघटना