कासार यांचा ‘स्वराविष्कार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 12:00 AM2019-09-29T00:00:03+5:302019-09-29T00:00:22+5:30
शब्दसुरांतून ओठांवर रेंगाळणाऱ्या बंदीशी आणि रागदारीच्या बहारदार सादरीकरणाने ज्ञानेश्वर कासार यांची मैफल रंगली. निमित्त होते ‘सूरविश्वास’चे आठवे पुष्प गुंफण्याचे.
नाशिक : शब्दसुरांतून ओठांवर रेंगाळणाऱ्या बंदीशी आणि रागदारीच्या बहारदार सादरीकरणाने ज्ञानेश्वर कासार यांची मैफल रंगली. निमित्त होते ‘सूरविश्वास’चे आठवे पुष्प गुंफण्याचे.
मैफलीची सुरुवात ‘मियाकी तोडी’ या रागाने केली. अल्हाददायक वातावरण निर्माण करणाºया ‘अब तो मोरे राम’ या बंदीशीला रसिकांनी भरभरून दाद दिली. शब्दांची, लयीची नजाकत दर्शवित ‘मै सन लागी’ बंदिश सादर केली. या बंदिशीनंतर ज्ञानेश्वर कासार यांनी आपली रचना सादर केली. ‘कासे कहु मन की बिचरा’तून मनाची अवस्था व्यक्त केल्यानंतर अहिर भैरव रागाचे सादरीकरण झाले. त्यानंतर पं.अविराज तायडे यांची रचना सादर झाली. शब्द होते ‘आवरे अव शाम’. मैफलीचा समारोप पं.जितेंद्र अभिषेकी यांच्या अभंगांनी करण्यात आला. अभंग होते ‘सुखाचे जे सुख, चंद्रभागे तटी, पुंडलीका पाठी उभे ठाके’ व ‘अनंता तुला कोण पाहू शके’. डॉ. आशिष रानडे (संवादिनी), रसिक कुलकर्णी (तबला), श्रीपाद घोलप, जागृती नागरे (तानपुरा) यांनी साथसंगत केली. कार्यक्र माचे सूत्रसंचालन विनायक रानडे व डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले. संगीत विषयात डॉक्टररेट पदवी प्राप्त केल्याबद्दल डॉ. आशिष रानडे, नृत्य विषयात डॉक्टररेट मिळाल्याबद्दल डॉ. सुमुखी अथनी, नवी दिल्ली येथील स्वर्ण भारत ट्रस्टतर्फे शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल ‘नेक्स्ट जनरेशन अवॉर्ड’ मिळाल्याबद्दल विजयालक्ष्मी मणेरीकर यांचा सन्मान अनुक्र मे सी.एल. कुलकर्णी, डॉ. मनोज शिंपी, पं. अविराज तायडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. कलाकारांचा सन्मान पं. जयंत नाईक, श्रीराम तत्त्ववादी, एन. सी. देशपांडे, मोहन उपासनी, कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.