काश्यपी धरणाचे पाणी गंगापूर धरणात
By Admin | Published: May 8, 2017 02:00 AM2017-05-08T02:00:44+5:302017-05-08T02:00:53+5:30
नाशिक : पावसाळा एक महिन्यावर येऊन ठेपल्यामुळे ९३ टक्के जलसाठा असलेल्या काश्यपी धरणामधून पाणीसाठा गंगापूर धरणामध्ये सोडण्यास सुरुवात झाली आहे
लोकमत न्यू नेटवर्क
नाशिक : पावसाळा एक महिन्यावर येऊन ठेपल्यामुळे ९३ टक्के इतका जलसाठा असलेल्या देवरगाव शिवारातील काश्यपी धरणामधून पाणीसाठा गंगापूर धरणामध्ये सोडण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत एक हजार ४०३ दशलक्ष घनफूट इतके पाणी काश्यपीमधून गंगापूर धरणात गेले आहे.
गंगापूर धरण समूहामध्ये गौतमी, काश्यपी या लहान धरणांचा समावेश होतो. गेल्या वर्षी जोरदार पाऊस झाल्याने काश्यपीचा जलसाठा चांगला होता. एक हजार ७३३ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा धरणात होता. ९३ टक्के भरलेल्या काश्यपीमधून गंगापूर धरणात पाणी सोडण्यास शनिवारी (दि.६) सुरुवात झाली.
दीड हजार दलघफू इतके पाणी गंगापूरमध्ये गेले असून, ७५ टक्के जलसाठा काश्यपीमधून गंगापूरमध्ये सोडण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. २५ ते ३० टक्के पाणीसाठा काश्यपीमध्ये ठेवण्यात येणार आहे. जेणेकरून परिसरातील शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही.
पावसाळा जवळ आल्यामुळे धरणातील पाणीसाठा वर्ग केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. डावा, उजवा कालवा, एकलहरे औष्णिक केंद्र आणि महानगरपालिका अशा सर्व घटकांसाठी गंगापूर धरणात पाणीसाठा आरक्षित आहे. गंगापूर धरणावरच शहरवासीयांच्या पाण्याची भिस्त अवलंबून आहे. नाशिकच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पाणीसाठ्याची मागणीही वाढू लागली आहे. यामुळे पावसाळ्यापर्यंत नाशिकला पाणीपुरवठा करण्यासाठी काश्यपीमधून घेण्यात आलेल्या जलसाठ्याचा मोठा आधार राहणार आहे. या जलसाठ्यामुळे गंगापूर धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन जलसाठा ४० ते ४५ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. जून महिन्यात वरुणराजाने वर्दी दिली अथवा पावसाचे आगमन लांबले तरीदेखील नाशिककरांवर पाणीटंचाईचे सावट ओढावण्याची चिन्हे सध्या नाही.