वर्गसंघर्ष मांडणारे ‘काठपदर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 12:45 AM2019-11-24T00:45:14+5:302019-11-24T00:45:30+5:30
कामगार आणि भांडवलदार यांचा शेकडो वर्षांपासून चालत आलेला वर्गसंघर्ष मांडणारे ‘काठपदर’ हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेत शनिवारी सादर झाले. नाटकाचा विषय रूपकात्मक पद्धतीने मांडण्याचा लेखक आणि दिग्दर्शकाचा प्रयत्न यशस्वी झाला.
नाशिक : कामगार आणि भांडवलदार यांचा शेकडो वर्षांपासून चालत आलेला वर्गसंघर्ष मांडणारे ‘काठपदर’ हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेत शनिवारी सादर झाले. नाटकाचा विषय रूपकात्मक पद्धतीने मांडण्याचा लेखक आणि दिग्दर्शकाचा प्रयत्न यशस्वी झाला.
परशुराम सायखेडकर नाट्यगृहात सुरू असलेल्या ५९व्या मराठी राज्य नाट्य स्पर्धेत शनिवारी कृतिशील निवृत्त संस्थेच्या काठपदर या नाटकाचे सादरीकरण झाले. नाटकातील कथा मालकीणबाई आणि त्यांच्या दोन मोलकरणी छबी आणि बबी यांच्या भोवती फिरते. छबी आणि बबी या दोघींचे मालकीण व्हायचे स्वप्न असते. मालकिणीच्या गैरहजेरीत या दोघी मालकिणीच्या साड्या नेसून मेक अप कीट वापरत मालकिणीच्या भूमिकेतही जायच्या. मालकिणीची जागा घेण्यासाठी या दोघी त्यांचा जीवदेखील घेण्याच्या प्रयत्नात असतात. या दोघी आपल्या गरिबीच्या आयुष्याला कंटाळलेल्या त्यामुळे झटपट श्रीमंत होण्याची आकांक्षा दिवसेंदिवस वाढत जाते. त्यात मालकिणीच्या छळाला त्या कंटाळलेल्या, त्यामुळे मालकिणीचा जीव घेण्याचा त्या दोघी कट रचतात. मग मालकिणीला चहामधून विष द्यायचे निश्चित होते. मालकिणीसाठी चहा बनवला जातो. पण नाटकात काही गोष्टी अशा घडत जातात की, मालकीण तो चहा पित नसल्याने चहा तसाच टेबलावर राहून जातो. याचदरम्यान मालकीण आता मरणार आणि मग मालकीण कोण होणार यावरून दोघींमध्ये बाचाबाची होऊन त्या दोघी अनवधानाने त्या कपातला अर्धा अर्धा चहा पितात आणि मरतात, असे नाटकाचे कथानक आहे.
नाटकाचे लेखन प्रा. दिलीप जगताप यांचे, तर दिग्दर्शन आरती प्रभू हिरे यांचे होते. नेपथ्य गणेश सोनवणे, प्रकाश योजना रवि रहाणे यांचे होते. वैशाली खाटीक मोरे यांनी नाटकाला संगीत दिले. वेशभूषा प्रणिल तिवडे, रंगभूषा माणिक कानडे यांची होती. नाटकात मनीषा शिरसाट (बबी), कविता अहेर (छबी), स्वाती शेळके (बाईसाहेब) या कलाकारांनी भूमिका साकारल्या. सुभाषचंद्र येवले व सुनंदा जरांडे यांनी निर्मिती साहाय्य केले.
आजचे नाटक :
आम्ही नाटक करतो म्हणजे
दुपारी १२.३0 वाजता.
प्रार्थनासूक्त- सायंकाळी ७ वाजता.