‘नृत्याली’चे कथ्थक नृत्य रंगले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 10:47 PM2019-06-15T22:47:40+5:302019-06-16T00:59:42+5:30
गोदाघाटावरील कापड बाजारातील बालाजी मंदिरात बालाजी संगीत नृत्य परिवाराच्या वतीने संगीत आणि शास्त्रीय नृत्य क्षेत्रातील गुरू-शिष्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नाशिकरोडच्या नृत्याली अकॅडमीच्या विद्यार्थिनीचे कथ्थक नृत्य रंगले.
नाशिक : गोदाघाटावरील कापड बाजारातील बालाजी मंदिरात बालाजी संगीत नृत्य परिवाराच्या वतीने संगीत आणि शास्त्रीय नृत्य क्षेत्रातील गुरू-शिष्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नाशिकरोडच्या नृत्याली अकॅडमीच्या विद्यार्थिनीचे कथ्थक नृत्य रंगले.
श्री व्यंकटेश बालाजी मंदिर कापड बाजार येथे बालाजी संगीत परिवारातर्फे सोनाली करंदीकर यांच्या नृत्याली संगीत अकादमीमधील शिष्यांनी भरतनाट्यम नृत्याची प्रस्तुती केली. यात प्रिया करंदीकर, ओजस्वी अहिरे, निधी जाधव, तनिषा पोरजे, साक्षी पेरीयार, विकीराज कदळे आदी विद्यार्थिनींनी विविध कथ्थक नृत्य प्रकार सादर केले. प्रिया करंदीकर यांनी निवेदन केले. प्रथम सत्रात ज्येष्ठ कलाकार नितीन वारे यांच्या शिष्यांनी तबलावादन केले.
दुसऱ्या सत्रात गणेशस्तुती, नृत्याची देवता नटराजस्तुती करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. पारंपरिक अलरिप, जतीस्वरम, तराणा अशा रचनांबरोबरच ‘पायोजी मैने राम रतन धन पायो’ या भजन गीतावर लहान मुलींनी नृत्य सादर केले. त्यानंतर ‘रामचंद्र कृपालू’ हे भजन तसेच ‘गोविंद दामोदर’ या भक्तिगीताने मैफलीचा समारोप झाला. बालाजी मंदिर संस्थानचे विश्वस्त वैशाली बालाजीवाले, गुरू नितीन वारे, सोनाली करंदीकर यांचे स्वागत केले. कार्यक्रमास रसिक उपस्थित होते.