स्थायी समितीच्या एका सदस्यत्वावर काथ्याकूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:20 AM2021-06-16T04:20:54+5:302021-06-16T04:20:54+5:30
महापालिकेत स्थायी समितीसह सर्व सदस्यांवर पक्षीय तौलनिक बळानुसार सदस्य नियुक्त केले जातात. त्यानंतर एखाद्या पक्षाच्या सदस्याची जागा रिक्त झाली, ...
महापालिकेत स्थायी समितीसह सर्व सदस्यांवर पक्षीय तौलनिक बळानुसार सदस्य नियुक्त केले जातात. त्यानंतर एखाद्या पक्षाच्या सदस्याची जागा रिक्त झाली, तर त्याच पक्षाचा नगरसेवक नियुक्त करण्यात येतो. मात्र, महापालिकेच्या निवडून आलेल्या सदस्यसंख्येत बदल झाला, तर मात्र पक्षीय तौलनिक बळ बदलते आणि त्यातून संघर्ष सुरू होतो. यापूर्वी भाजपचे नगरसेवक सुदाम नागरे तसेच शांताबाई हिरे यांचे निधन झाल्यानंतर शिवसेनेने पक्षीय तौलनिक बळाचा मुद्दा थेट न्यायालयात नेला होता. त्यामुळे शिवसेनेचा एक ज्यादा सदस्य स्थायी समितीत दाखल झाला. मात्र, समितीचे सभापतीपद गणेश गिते यांनी आपल्याकडेच राखण्यात यश मिळवले.
दरम्यान, आता शिवसेनेच्या स्थायी समिती सदस्या सत्यभामा गाडेकर आणि कल्पना पांडे यांच्या निधनामुळे या पक्षाचे संख्याबळ कमी झाले आहे. त्यामुळे कमी झालेली एक जागा पुन्हा भाजपाच्या वाट्याला येत असल्याचा दावा सभागृह नेते कमलेश बोडके यांनी केला आहे. त्यामुळे महापालिकेत पुन्हा या जागेवर खल सुरू झाला आहे.