कुष्ठरोगींना पालिकेमार्फत मानधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 01:31 AM2017-07-29T01:31:00+5:302017-07-29T01:31:00+5:30
शहरातील सुमारे ३३८ कुष्ठरोगींना महापालिकेच्या वतीने दरमहा १५०० रुपये मानधन दिले जाणार असून, वैद्यकीय विभागाने सादर केलेल्या प्रस्तावाला आयुक्तांनी मान्यता दिली आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे कुष्ठपीडितांना मोठा आधार लाभणार आहे.
नाशिक : शहरातील सुमारे ३३८ कुष्ठरोगींना महापालिकेच्या वतीने दरमहा १५०० रुपये मानधन दिले जाणार असून, वैद्यकीय विभागाने सादर केलेल्या प्रस्तावाला आयुक्तांनी मान्यता दिली आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे कुष्ठपीडितांना मोठा आधार लाभणार आहे. सदर प्रस्तावावर आता लेखा विभागामार्फत अंतिम कार्यवाही सुरू आहे. कुष्ठरोगींना समाजात वावरताना मोठ्या प्रमाणावर अडचणी येतात. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध सेवाभावी संस्थांमार्फत उपक्रम राबविले जात असतात परंतु, कुष्ठरोगींना जगण्यासाठी आर्थिक हातभार लावता येईल काय, याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन होता. मागील पंचवार्षिक काळात तत्कालीन नगरसेवक रूपाली गावंड यांनी कुष्ठरोगींना दरमहा १००० रुपये मानधन देण्याचा प्रस्ताव महासभेसह स्थायी समितीवर ठेवला होता. फेब्रुवारी २०१७ मध्ये महापालिका निवडणुका झाल्यानंतर नवनिर्वाचित नगरसेवक जगदीश पाटील आणि हेमंत शेट्टी यांनी एप्रिलच्या महासभेत कुष्ठरोगींना दरमहा १५०० रुपये मानधन त्यांच्या बॅँक खात्यात जमा करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाला महासभेसह स्थायीने मंजुरी दिल्यानंतर आयुक्तांनीही त्यास हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे, शहरातील ३३८ कुष्ठपीडितांना आर्थिक साहाय्य लाभून त्यांना जगण्याचा आधार मिळणार आहे. वैद्यकीय विभागाने सदरचा प्रस्ताव लेखा विभागाकडे पाठविला असून, तो कार्यवाहीत आहे. या निर्णयामुळे महापालिकेला प्रतिवर्षी अंदाजपत्रकात सुमारे ६१ लाख रुपयांची तरतूद करावी लागणार आहे.
१५१ संशयित रुग्ण आढळले
महापालिकेने सप्टेंबर-आॅक्टोबर या कालावधीत शहरात कुष्ठरोग शोध अभियान राबविले होते. कुष्ठरोगींचे प्रमाण जास्त असलेल्या भागात सदर अभियान राबविण्यात आले होते. महापालिकेने शोध अभियानात दोन लाख २३ हजार नागरिकांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यात १५१ संशयित रुग्ण आढळून आले होते. सदर संशयितांची तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत पुन्हा तपासणी केली असता शहरातील विविध भागांत नवीन १४ रुग्णांना कुष्ठरोग झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र, कुष्ठपीडितांची संख्या त्याहून अधिक असल्याचा दावा माजी नगरसेवक भगवान भोगे यांनी केला होता. त्यामुळे, लाभार्थींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.