कावनई, टाकेदला आजपासून संचारबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 01:20 AM2021-03-10T01:20:49+5:302021-03-10T01:21:53+5:30
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता इगतपुरी तालुक्यातील धार्मिक स्थळे असलेल्या श्री क्षेत्र कावनई व सर्वतीर्थ टाकेद येथे यात्रा कालावधीत तीन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. महाशिवरात्रीच्या पाश्व’भूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
घोटी : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता इगतपुरी तालुक्यातील धार्मिक स्थळे असलेल्या श्री क्षेत्र कावनई व सर्वतीर्थ टाकेद येथे यात्रा कालावधीत तीन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. महाशिवरात्रीच्या पाश्व’भूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत इगतपुरी तहसिल प्रशासन, तालुका आरोग्य विभाग व घोटी पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांना दोन्ही धार्मिक स्थळी येण्यास बंदी असणार आहेत. त्याचप्रमाणे फराळ वाटप, पूजा विधी हे कार्यक्रम देखील बंद करण्यात आले आहेत. दरम्यान प्रशासनाने व्यापारी व स्थानिक नागरिकांना दुकाने बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
यापूर्वी प्रांत अधिकारी तेजस चव्हाण, ग्रामीण पोलीस उपअधीक्षक डॉ. अर्जुन भोसले,घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, सर्वतीर्थ टाकेद संस्थानचे महंत श्री किशोरदास श्रीवैष्णव, महंत फलहारी महाराज, महंत उडिया महाराज, कावनईचे ट्रष्टी कुलदीप चौधरी यांनी बैठक घेऊन यात्रा उत्सव बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
मंदिरही राहणार बंद
दि.१० ते १३ मार्च पर्यंत टाकेद तीर्थ पूर्णपणे मंदिरांसह बंद राहणार असून या पाच दिवस टाकेद तीर्थावर स्थानिक ग्रामपंचायत, मंदिर संस्थान,पोलीस प्रशासनाची करडी नजर असणार आहे. नियम तोडून कोणी गैरवर्तन केल्यास सदर व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाही केली जाणार आहे.