कविताला हवी ‘क्लासवन’ पोस्ट

By admin | Published: November 8, 2016 12:36 AM2016-11-08T00:36:37+5:302016-11-08T00:53:41+5:30

निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे

Kavitha wants 'classavan' post | कविताला हवी ‘क्लासवन’ पोस्ट

कविताला हवी ‘क्लासवन’ पोस्ट

Next

नाशिक : रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील खेळाडूंना ‘क्लासवन’ पदावर शासकीय सेवेत सामावून घेतले जाईल, अशी घोषणा करूनही शासनाने वर्ग तीन पदावर आदिवासी विभागात नोकरी दिल्याने कविताने या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
विविध खेळांमध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या राज्यातील आठ खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. त्यामध्ये नाशिकच्या कविता राऊतचादेखील समावेश करण्यात येऊन तिला आदिवासी विकास विभागात नोकरी देण्यात आली. मात्र वर्ग तीन पदावर नियुक्ती देण्यात आल्याने कविताने या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. नियुक्ती देताना शैक्षणिक पात्रतेच्या निकषाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आक्षेपही कविताने नोंदविल्याचे समजते.
मुख्यमंत्र्यांनी आॅलिम्पियन खेळाडूंना ‘क्लासवन’ पदावर नियुक्ती दिली जाईल असे यापूर्वीच जाहीर केले असतानाही आपणास वर्ग तीन पदावर नियुक्त करण्यात आले. वास्तविक अन्य एका आॅलिम्पियनला मात्र वर्ग-१ पदावर नियुक्ती देण्यात आली असल्याचेही कविताने निदर्शनास आणून दिले आहे. खेळाडूंना नोकरीमध्ये सामावून घेताना त्यांची शैक्षणिक अट शिथिल करण्यात यावी, असा निकष आहे. कविता पुढील वर्षी पदवीप्राप्त करणार असल्याने शैक्षणिक पात्रतेनुसार नियुक्ती देणे अपेक्षित असल्याचे कविताने म्हटले आहे. कविता सध्या ‘ओएनजीसी’ मध्ये एक्झिक्युटिव्ह एच.आर. या क्लासवन पदावर कार्यरत आहे.

योग्य निर्णय होईल
शासनाने दिलेली नोकरी म्हणजे हा माझा व इतर खेळाडूंचाही सन्मानच आहे. नियुक्ती देताना शासकीय पातळीवर काही बाबी दुर्लक्षित झाल्या असतील त्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत. शासन योग्य तो निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे. - कविता राऊत, धावपटू.

Web Title: Kavitha wants 'classavan' post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.