काजी गढी संरक्षित, तरी असंरक्षित
By admin | Published: August 26, 2016 12:17 AM2016-08-26T00:17:05+5:302016-08-26T00:17:13+5:30
लवकरच लावणार फलक : १९५० पासून भारतीय पुरातत्त्व विभागाच्या यादीत समाविष्ट
नाशिक : जुने नाशिकमधील काजीची गढी ही भारतीय पुरातत्त्व विभागाने १९५० मध्येच संरक्षित वास्तू म्हणून घोषित केली आहे; मात्र अद्याप गढी असंरक्षित असून, काळानुरूप असुरक्षितही बनली आहे. पुरातत्त्व विभागाने नाशिकमधील सदर वास्तू ‘जुनी मातीची गढी’ या नावाने संरक्षित वास्तू म्हणून नोंदविली आहे.
शहरी लोकवस्तीमधील अत्यंत संवदेनशील वास्तू म्हणून भारतीय पुरातत्त्व विभागाच्या औरंगाबाद कार्यालयाने काजी गढीचे वर्गीकरण ‘क’ गटात केले आहे. गढीचे मालक कोण? असा प्रश्न जिल्हा प्रशासनाने महापालिका प्रशासनाला विचारला होता. त्यामुळे गढीच्या संरक्षण भिंतीचा मुद्दा बाजूला पडून नवीन वाद चव्हाट्यावर आला होता. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बचत निधीमधून गढीला संरक्षण भिंत बांधण्याची तयारी पालिकेने करत तसा प्रस्ताव जलसंपदा व जिल्हा प्रशासनाकडे पाठविला होता; मात्र अद्याप या प्रस्तावावर निर्णय होऊ शकला नाही. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते देवांग जानी यांनी सांस्कृतिक मंत्रालयाकडे याबाबत तक्रार केली होती. सदर तक्रार थेट औरंगाबाद कार्यालयाकडे वर्ग करण्यात आली आहे. राज्यातील एकूण २८५ ठिकाणे जे राष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत, अशा भारतीय पुरातत्त्व विभागाच्या यादीत १५४व्या क्रमांकावर नाशिकची ‘जुनी मातीची गढी’ म्हणून काजी गढीचा उल्लेख आहे.
सर्वेक्षण करून लवकरच या ठिकाणी संरक्षित वास्तूचा फलक पुरातत्त्व विभागाकडून लावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कागदोपत्री १९५० पासून गढी संरक्षित जरी असली तरी त्या दृष्टीने पुरातत्त्व खात्याने उपाययोजना अद्याप केल्या नाहीत. त्यामुळे गढी असंरक्षित राहिली तसेच ती असुरक्षितही बनली आहे. (प्रतिनिधी)