केबीएच विद्यालय : ‘मी कायदा पाळणार अन् सक्षम नागरिक होणार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 09:14 PM2018-12-05T21:14:25+5:302018-12-05T21:17:17+5:30
निमित्त होते, ‘छोटा पोलीस’ उपक्रमाचे. पोलीस आयुक्तालय, शहर वाहतूक नियंत्रण शाखा व आदिवासी सेवा समितीच्या संयुक्त विद्यमाने वडाळागावातील केबीएच विद्यालयात बुधवारी (दि.५) आयोजन करण्यात आले होते.
वडाळागाव : ‘मी कायदा पाळणार अन् सक्षम नागरिक होणार’ असा संकल्प ‘पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांच्यासमवेत वडाळागावातील क र्मविर भाऊसाहेब हिरे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सोडला.
निमित्त होते, ‘छोटा पोलीस’ उपक्रमाचे. पोलीस आयुक्तालय, शहर वाहतूक नियंत्रण शाखा व आदिवासी सेवा समितीच्या संयुक्त विद्यमाने वडाळागावातील केबीएच विद्यालयात बुधवारी (दि.५) आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने प्रथमच सिंगल यांनी वडाळ्यातील शाळेला भेट देत तेथील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. शहरातील शाळा-महाविद्यालयांना भेटी देत जनजागृतीपर उपक्रम राबविणारे पोलीस आयुक्त प्रथमच वडाळ्यातील या माध्यमिक विद्यालयात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये कमालिचा उत्साह पहावयास मिळाला. व्यासपिठावर शहर वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त अशोक नखाते, पोलीस निरिक्षक नारायण न्याहाळदे, विनायक लोहकरे, माजी मुख्याध्यापक राजेश बडोगे, सामाजिक कार्यकर्ते सुनील माधव खोडे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सिंगल विद्यार्थ्यांना उद्देशून म्हलाले, या देशाचे आपण भावी नागरिक आहोत. आदर्श नागरिक होण्यासाठी कायद्याचे पालन करणे ही आपली प्रथम जबाबदारी आहे. आपल्या आजुबाजुला बेकायदेशीर वर्तणूक होत असेल तर त्याची माहिती सर्वप्रथम आई-वडिलांना द्या त्यानंतर शिक्षकांना व त्यांच्यामार्फत पोलिसांपर्यंत पोहचवा, त्यावर पोलीस कायदेशीर कारवाई नक्कीच करतील, असे त्यांनी यावेळी सांगितले. आपल्या आई विडलांना अभिमान वाटेल असे काम करा .आपल्या शिक्षकांचा व आईवडीलांचा आदर करत त्यांच्या सूचनांचे पालन करा त्यांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करुन दाखवा. शालेय वयातच आपले ध्येय निश्चित करण्याचा प्रयत्न करावा, असा मौलिक सल्ला सिंगल यांनी विद्यार्थ्यांना दिला. आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून या देशाचे जबाबदार नागरिक अधिकारी पदावर सेवा देत असल्याची अनेक उदाहरणे आपल्यापुढे असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक के दारे यांनी केले. सुत्रसंचालन डी.एस.अहिरे यांनी केले व आभार एम.आर.बाविस्कर यांनी मानले.