'चोरीछुपे गर्भलिंग निदान करणाऱ्या सोनोग्राफी सेंटरवर ‘वॉच’ ठेवा'
By अझहर शेख | Published: February 28, 2023 06:05 PM2023-02-28T18:05:52+5:302023-02-28T18:06:19+5:30
लेक वाचवा, लेक वाढवा : आरोग्यविभागाला गंगाथरण डी यांनी दिले आदेश
नाशिक : नोंदणी नसलेल्या सोनोग्राफी सेंटर्सची माहिती घेवून त्यांच्यावर निगराणी ठेवण्यात यावी तसेच अवैध सोनोग्राफी सेंटर्सच्या माध्यमातून चोरीछुप्या पद्धातीने गर्भलिंग निदान होणार नाही, यासाठी आरोग्यविभागाने सतर्कता बाळगणे गरजेचे असून जे कोणी गर्भलिंग निदान करताना आढळून येतील त्यांच्या सोनोग्राफी सेंटरवर कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात मंगळवारी आरोग्य विभागाच्या पीसीपीएनडीटी व राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रम व तंबाखु नियंत्रण कायदा२००३ अंतर्गत जिल्हास्तरीय समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत गंगाथरन डी. बोलत होते. यावेळी ते म्हणाले, लेक वाचवा, लेक वाढवा या अभियानाची जिल्हाभरात अंमलबजावणी करताना आरोग्य विभागासोबतच शिक्षण, महिला व बालविकास या विभागाचे सहकार्य घेण्यात यावे.
यावेळी पीसीपीएनडीटी समितीच्या कामाचा आढावा घेताना ते म्हणाले या समितीच्या अंतर्गत मुलींचा जन्मदर वाढविण्याच्या दृष्टिने आशासेविका, अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून गावपातळीवर गर्भवती महिलांचे सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. त्यातील पहिले अपत्य मुलगी असेल अशा गर्भवती महिलांचे समुपदेशन करण्यात यावे. त्याचप्रमाणे सर्वेक्षण केलेल्या गर्भवती महिलांच्या प्रसूतीबाबत देखील सविस्तर माहिती घेण्यात यावी. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. उत्कर्ष दुधेडिया, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य संपर्क) सुनिल राठोड, डॉ. अनंत पवार, शिक्षणाधिकारी भागवत फुलारी, राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रम विभागाच्या उज्ज्वला पाटील यांच्यासह ग्रामीण, उपजिल्हा व महिला रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी उपस्थित होते.
सहा तालुके तंबाखुमुक्त; ५००शाळांमध्ये अभियान
राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समितीने वर्षभरात राबविलेल्या उपाययोजनांची माहिती बैठकीच्या प्रारंभी देण्यात आली. जिल्ह्यातील दिंडोरी, निफाड, चांदवड, पेठ, कळवण व सुरगाणा हे सहा तालुके तंबाखुमुक्त झाले आहेत. तसेच एप्रिल,२०२२ ते नोव्हेंबर,२०२२ या कालावधीत जिल्ह्यातील साधारण ५०० शाळांमध्ये तंबाखुमुक्त शालेय अभियान राबविण्यात आल्याचा दावा करण्यात आला.