‘आळंदी’चे पाणी शेतीसाठीच राखीव ठेवा
By admin | Published: October 19, 2015 11:49 PM2015-10-19T23:49:23+5:302015-10-19T23:51:19+5:30
देवीदास पिंगळे : सेंट्रल गोदावरीचे निवेदन
नाशिक : जिल्ह्यातील धरणांमधील पाणी जायकवाडी धरणात सोडण्याचा निर्णय चुकीचा असून, कोणत्याही धरणातील पाणी जायकवाडीला सोडण्यात येऊ नये, अशी मागणी सेंट्रल कृषक गोेदावरी सहकारी बॅँकेच्या संचालकांनी केली. तर आळंदी धरणातील पाणी शेतीसाठीच राखीव ठेवण्यात यावे, अशी मागणी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
माजी खासदार देवीदास पिंगळे व सेंट्रल गोदावरी कृषक सेवक संस्थेचे अध्यक्ष नगरसेवक दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आळंदी धरणालगत बहुतांश शेतकऱ्यांच्या फळबागा असून, शेतकऱ्यांना फळबागेसाठी पाण्याची अत्यंत गरज आहे. त्यामुळे आळंदी धरणाचे पाणी शेतकऱ्यांच्या फळबागांसाठी राखीव न ठेवल्यास फळबागा उद्ध्वस्त होतील. त्यामुळे आळंदी धरणातील पाणी शेतीसाठी व जनावरांच्या पिण्यासाठी राखीव ठेवण्यात यावे, अशी मागणी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी केली आहे.
तसेच सेंट्रल कृषक गोेदावरी सहकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष नगरसेवक दिनकर पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्णात कमी पाऊस झालेला असल्याने धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसताना जायकवाडी धरणाला पाणी सोडल्यास जिल्ह्णातील पिण्याच्या पाण्याची व शेतीसाठी पाण्याची परिस्थिती वाईट होऊ शकते. आळंदी धरणातील पाणी शेतीसाठीच राखीव ठेवण्यात यावे, पाण्यावरून संघर्ष टाळण्यासाठी सरकारने राष्ट्रीय नद्या जोड प्रकल्प राबवावा, यासह विविध मागण्यांचा समावेश आहे. यावेळी सेंट्रल गोदावरी कृषक सेवा संस्थेचे उपाध्यक्ष हिरामण बेंडकुळी, मधुकर खांडबहाले, रामदास चव्हाण, पुंजाराम थेटे, तानाजी पिंगळे, अनिल काकड, रामदास पिंगळे, संदीप पाटील, निवृत्ती शिंदे, अमोल पाटील, पंडित कातड, ज्ञानेश्वर वाघ, शंकर डबले, मोतीराम गायकर, पंडित गायकर आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)