सटाण्यात वाळू तस्करी रोखण्यासाठी ‘जागते रहो’ मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 01:12 AM2019-11-18T01:12:23+5:302019-11-18T01:13:15+5:30
सटाणा तालुक्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत असल्यातरी वाळू तस्करी मात्र थांबेना अशी परिस्थिती तालुक्यात आहे. वाळू तस्करी रोखण्यासाठी स्वत: तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी ‘‘जागते रहो’’ अभिनव मोहीम हाती घेतली असून, पहिल्याच रात्री वाळूची चोरटी वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर सापळ्यात अडकले आहे. या विशेष मोहिमेमुळे वाळू- माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
सटाणा : तालुक्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत असल्यातरी वाळू तस्करी मात्र थांबेना अशी परिस्थिती तालुक्यात आहे. वाळू तस्करी रोखण्यासाठी स्वत: तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी ‘‘जागते रहो’’ अभिनव मोहीम हाती घेतली असून, पहिल्याच रात्री वाळूची चोरटी वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर सापळ्यात अडकले आहे. या विशेष मोहिमेमुळे वाळू- माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
बागलाण तालुक्यातील मोसम, आरम या प्रमुख नद्यांसह हत्ती, कान्हेरी, करंजाडी, दोध्याड या नद्या परतीच्या पावसामुळे गेल्या पंचवीस वर्षांनंतर आजही दुथडी भरून वाहत आहेत. असे असताना वाळूमाफियांनी वाळू चोरीसाठी नामी शक्कल लढवत मोटारसायकलवर गोण्या भरून वाळू उपसा केला जात असून दिवसभर गोण्या भरून निर्जनस्थळी वाळूचा साठा केला जातो आणि रात्री ट्रॅक्टरने वाळूची वाहतूक केली जाते. वाळू तस्करी रोखण्यासाठी बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी ‘‘जागते रहो’’ मोहीम हाती घेतली आहे. रात्री तहसीलदार इंगळे पाटील यांचे पथक मोहिमेवर असताना मोसम नदी परिसरात जायखेडा येथे दोन विना नंबरचे ट्रॅक्टर वाळूची चोरटी वाहतूक करताना आढळून आले. यावेळी गस्ती पथकाने रात्री २ वाजेच्या सुमारास पाठलाग करून दोन्ही ट्रॅक्टर पकडले.