शाश्वत विकासासाठी विवेकबुध्दी जागृत ठेवावी : तुकाराम मुंढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 09:58 PM2018-06-20T21:58:42+5:302018-06-20T21:58:42+5:30
नैसर्गिक स्त्रोत हे वैयक्तिक मालकीचे नसून सामुहिक मालकीचे आहे, त्यावर सर्वांचा अधिकार आहे, असा दृष्टिकोन जोपर्यंत विकसीत होत नाही, तोपर्यंत शाश्वत विकासाची संकल्पना अंमलात येऊ शकत नाही, असे मुंढे म्हणाले.
नाशिक : शहरामधील जीवनमान उंचविण्यासाठी स्वयंरोजगारनिर्मितीसह मुलभूत सोयीसुविधांचा दर्जा सुधारणे आवश्यक आहे. स्मार्ट शहराकडे वाटचाल करताना मुलभूत सोयीसुविधा पुरविणे महापालिकेची जबाबदारी आहे. कारण 'स्मार्ट शहर' केवळ नावापुरते असून चालणार नाही. त्यासाठी शाश्वत विकास गरजेचा आहे, त्यामुळे शहराचे नागरिक या नात्याने शाश्वत विकास संकल्पनेच्या अंमलबजावणीसाठी विवेकबुध्दी जागृत ठेवावी, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केले.
डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेचे ५४ वे पुष्प मुलभूत हक्क आंदोलन समितीच्या वतीने बुधवारी (दि.२०) परशुराम सायखेडकर सभागृहात आयोजित करण्यात आले होते. यावेळी मुंढे यांनी 'महानगर प्रशासन-शासन व नागरिक' याविषयावर व्याख्यानातून प्रशासनाची व नागरिकांची कर्तव्ये-अधिकार, नगरनियोजन धोरण-अंमलबजावणी या बाबींचा आढावा घेतला. यावेळी मुंढे म्हणाले, नाशिककरांना आज पाणी मिळत असले तरी ते पुरेसे आणि गुणवत्तापुर्ण नाही. नाशिकमध्ये भविष्यात २४ तास पाणीपुरवठा नळांमधून व्हावा, हा प्रयत्न राहणार आहे. नवीन वसाहती ज्या उदयास येत आहे तेथे पिण्याच्या पाण्याच्या उप जलवाहिन्या टाकणे तसेच जलवाहिन्यांची दुरूस्ती करणे गरजेचे आहे. यासाठी ५० कोटींची गरज आहे; मात्र त्यासाठी कोणीही प्रश्न उपस्थित करीत नाही, असेही मुंढे म्हणाले. भुमिगत ड्रेनेजची व्यवस्था सुधारायची असेल तर त्यासाठी कर लावावा लागेल, कारण त्या सुविधेचा दर्जा सुधारण्यासाठी खर्च करावा लागणार आहे. तो खर्च कर स्वरुपात भागवावा लागणार आहे. तरच गोदावरी शुध्द होईल आणि सांडपाण्याची विल्हेवाट लागेल.
...म्हणून नाशिककर भाग्यवान
सोलापूरला पिण्याचे पाणी दुषित स्वरुपाचे असल्याचे सिध्द झाले आहे. नाशिककर भाग्यवान आहे की, गंगापूर, मुकणे धरणाच्या वरच्या बाजूस मोठी शहरे नाही. नैसर्गिक स्त्रोत हे वैयक्तिक मालकीचे नसून सामुहिक मालकीचे आहे, त्यावर सर्वांचा अधिकार आहे, असा दृष्टिकोन जोपर्यंत विकसीत होत नाही, तोपर्यंत शाश्वत विकासाची संकल्पना अंमलात येऊ शकत नाही, असे मुंढे म्हणाले.
'नाशिक माझं घर'
हे शहर म्हणजे माझे घर आहे. घर चांगले रहावे ही माझी जबाबदारी आहे. घर चालविताना मला कर्तव्याची जाणीव करुन द्यावीच लागणार आहे. या शहरात सर्व मुलभूत सोयीसुविधा नागरिकांना चांगल्या दर्जाच्या मिळाव्या यासाठी मला कर आकारावे लागेल, पण करवाढ नियमबाह्य मुळीच राहणार नाही, याचा विश्वास बाळगावा, असे मुंढे म्हणाले.