गडकिल्ल्यांचा ठेवा जतन व्हावा
By admin | Published: February 19, 2017 12:40 AM2017-02-19T00:40:44+5:302017-02-19T00:41:01+5:30
दुर्गप्रेमींची धडपड : पुरातत्त्व खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष
नाशिक : एकेकाळी ज्या भूमीवर शिवरायांनी लढाया केल्या त्या नाशिक जिल्ह्यात पुरातत्त्व खात्याकडे कागदोपत्री नोंद असलेल्या गडकिल्ल्याची संख्या ६० पेक्षा जास्त आहे. याशिवाय अन्य डझनभर गडकिल्ले अस्तित्वहीन झाली असून, अज्ञात असल्यासारखीच आहेत. यासर्वच पाऊणशे किल्ल्यांची दुरवस्था झाली असून, हा ऐतिहासिक ठेवा जतन व्हावा यासाठी नाशिकमधील दुर्गप्रेमीं तरुण मंडळी धडपड करत आहेत. सह्याद्रीच्या डोंगर रांगामधील सालबर्डी आणि सातमाळ या उपरांगाच्या भूप्रदेशात शिवकालीन अनेक जुनी मंदिरे आणि ऐतिहासिक किल्ले असून, त्याकडे पुरातत्त्व खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. यासंबंधी जिल्ह्यातील अनेक दुर्गप्रेमी तरुण मंडळी आणि सेवाभावी संस्था पाठपुरावा करून हा ऐतिहासिक ठेवा जतन राहावा यासाठी पुरातत्त्व खात्याकडे तसेच शासनाच्या संबंधित विभागाकडे वारंवार निवेदन देत असूनही कुठलीही हालचाल होत नाही. त्यामुळे नाशिक शहरासह ग्रामीण भागातील तरुणांनी स्वत: पुढाकार घेत एकत्र येऊन गडकिल्ल्याच्या जतन आणि संवर्धनाची मोहीम हाती घेतली आहे. गेल्या पाच वर्षांपासून ही तरुण मंडळी प्रत्येक महिन्याच्या रविवारी किंवा सुटीच्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील एका किल्ल्यावर जाऊन श्रमदान करून गडकिल्ल्यांचा परिसर स्वच्छ करतात. आतापर्यंत रामशेज, साल्हेर, मुल्हेर, चांदवड, धोडप आदि किल्ल्यांवरही मोहीम राबविण्यात आली. याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांनी टाकलेले प्लॉस्टिक कॅरीबॅग, कागद, कचरा गोळा करतात. तसेच गडकिल्ल्यांवर तलाव, पाण्याचे टाके असल्यास तेथील गाळ व माती काढतात अशी माहिती शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संयोजक योगेश कापसे आणि डॉ. अजय कापडणीस यांनी दिली.