खाकीवर्दीचे पावित्र्य जपा! : उद्धव ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 01:34 AM2019-12-31T01:34:04+5:302019-12-31T01:34:26+5:30
महाराष्ट पोलीस दलाचा वैभवशाली इतिहास सदैव स्मरणात ठेवून निष्ठा व प्रामाणिकपणा जोपासून ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद घेऊन कर्तव्य बजवावे. कठोर परिश्रमानंतर तुम्ही कमाविलेल्या ‘खाकी’वर उभ्या आयुष्यात कलंक लागू देऊ नका, तसेच खादीवर्दीचे पावित्र्य जपा, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
नाशिक : महाराष्ट पोलीस दलाचा वैभवशाली इतिहास सदैव स्मरणात ठेवून निष्ठा व प्रामाणिकपणा जोपासून ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद घेऊन कर्तव्य बजवावे. कठोर परिश्रमानंतर तुम्ही कमाविलेल्या ‘खाकी’वर उभ्या आयुष्यात कलंक लागू देऊ नका, तसेच खादीवर्दीचे पावित्र्य जपा, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
सरळसेवेची परीक्षा उत्तीर्ण करून प्रशिक्षणार्थी म्हणून महाराष्टÑ पोलीस प्रबोधिनीत दाखल झालेल्या उपनिरीक्षकांच्या क्रमांक ११७व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा सोमवारी (दि.३०) येथील कवायत मैदानावर दिमाखात पार पडला. यावेळी ६८८ प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांनी सशस्त्र संचलन करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री एकनाथ शिंदे, पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांना मानवंदना दिली. यावेळी ठाकरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले, राज्यापुढे सुरक्षेची विविध आव्हाने उभी ठाकली आहेत, मात्र राज्याचे पोलीस दल त्या आव्हानांशी दोन हात करण्यासाठी सक्षम आहे, यावर माझा ठाम विश्वास आहे. आजपासून तुम्हीदेखील या पोलीस दलाचे घटक झाले असून, भविष्यात जनतेसाठी सेवाव्रत निष्पक्षपणे अंगीकारावे. याप्रसंगी आमदार आदित्य ठाकरे, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, सहसंचालक संजय मोहिते, उपसंचालक घनश्याम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, प्रबोधिनीच्या संचालक अश्वती दोरजे यांनी अहवाल वाचन केले. अष्टपैलू कामगिरी करत प्रशिक्षण कालावधीत विविध विषयांमध्ये विशेष प्रावीण्य मिळविणारे सोलापूरचे संतोष अर्जुन कामटे यांना सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून ठाकरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. उपनिरीक्षक विजया पवार यांना सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षणार्थी म्हणून अहल्यादेवी होळकर व सावित्रीबाई फुले चषकाने सन्मानित करण्यात आले.
दोघी बहिणी ‘पासआउट’
घरात तीन बहिणी आणि आई एवढेच कुटुंब. आईची प्रचंड जिद्द की तीनही मुली सरकारी नोकरीत अधिकारी व्हाव्यात. माउलीने जिवाचे रान करत मुलींना उच्चशिक्षित केले. उपनिरीक्षक झालेल्या विजया प्रकाश पवार-चव्हाण यांचा बारावीचे शिक्षण घेताना विवाह झाला. इच्छा शिक्षक होण्याची असल्यामुळे डी.एड केले, मात्र शिक्षक भरती रेंगाळल्याने शिक्षक होता आले नाही. विजया यांनी महाराष्टÑ लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचे ठरविले. देवळा तालुक्यातील पवार कुटुंबातील विजया व त्यांची बहीण वृषाली पवार यादेखील याच तुकडीमधून उपनिरीक्षक म्हणून पासआउट झाल्या. त्यांची एक बहीण जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहे. योगायोग असा की ज्या तुकडीत बहीण प्रशिक्षणार्थी आहे, त्याच तुकडीच्या सेकंड कमांडर म्हणून विजया यांनी आज नेतृत्व केले. हा क्षण केवळ येथील गुरुजनांमुळेच अनुभवयास आला, अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.
प्रशिक्षणार्थींनी प्रथमच सीमेवर गिरविले धडे
प्रबोधिनीत फौजदाराचे प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थींना यंदा प्रथमच थेट भारतीय सीमा सुरक्षा दलासोबत एक आठवड्याचे प्रशिक्षण देशाच्या विविध सीमांवर जाऊन घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. यामध्ये मिझोराम, आगरतळा, मेघालय, जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात, आसाम या राज्यांमधील बीएसएफच्या बेस कॅम्पमध्ये मुक्कामी राहत प्रशिक्षणार्थींनी आठवडाभर सुरक्षेचे धडे गिरविले.
...अशी होती ११७वी तुकडी
प्रशिक्षणार्थी फौजदारांच्या ११७व्या तुकडीत राज्यातील ४७६ पुरुष, १९२ महिलांचा समावेश आहे. यामध्ये कलाक्षेत्रातून २८९, विज्ञान शाखेचे १८२, वाणिज्यमधून शिक्षण घेतलेले ४९ आणि ६८ प्रशिक्षणार्थी अभियांत्रिकी शाखेचे होते.
...आता द्यावी ‘रिव्हॉल्व्हर आॅफ आॅनर’
काळानुरूप सुरक्षेची आव्हाने बदलली असून, पोलीस दलानेही आधुनिकतेची कास धरली आहे. तलवारीचा इतिहास शौर्य गाजविणारा नक्कीच आहे, मात्र काळानुरूप शस्त्र बदलावीच लागतात. त्यामुळे आता यापुढे ‘स्वॉर्ड आॅफ आॅनर’ म्हणून मानाची तलवार सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थीला प्रदान करण्याऐवजी मानाची रिव्हॉल्व्हर प्रदान केली जावी, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या अखेरीस केली.