जिल्ह्यात धग कायम

By admin | Published: June 3, 2017 01:36 AM2017-06-03T01:36:53+5:302017-06-03T01:37:18+5:30

नाशिक : राज्यभरातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला नाशिक जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Keeping the eye in the district | जिल्ह्यात धग कायम

जिल्ह्यात धग कायम

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : राज्यभरातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला नाशिक जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ठिकठिकाणी शेतकरी आक्रमक झाले असून, त्यांनी बाहेरगावी जाणारा शेतमाल रोखून धरतानाच काही ठिकाणी रस्त्यावर टायर जाळून रास्ता रोको, तर काही ठिकाणी सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून सामूहिक मुंडण केले.


दरम्यान जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये शेतमालाची आवक होत नसल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. येवला तालुक्यातील आंदोलक शेतकऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून सहा शेतकऱ्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे.
ओझर, अभोणा, जायखेडा, नांदूरशिंगोटे या मोठ्या गावांच्या ठिकाणी शुक्रवारचा आठवडे बाजार भरला नाही. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. ओझर येथे सर्वपक्षीय बंद पाळण्यात आल्याने बाजारपेठेत शुकशुकाट जाणवला. देवळा तालुक्यातील दहीवड तसेच येवला तालुक्यातील धुळगाव येथे शेतकरीविरोधी धोरण स्वीकारणाऱ्या शासनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. जायखेडा येथील औरंगाबाद-अहवा राज्यमार्गावर अचानक तीनशे ते चारशे शेतकऱ्यांनी ठिय्या देऊन दीड तास वाहतूक रोखून धरली. नाशिक व गुजरातकडे भाजीपाला व दूध जाऊ नये यासाठी कळवणच्या नेत्यांनी नांदूरी घाटात तळ ठोकून वाहनांची तपासणी केली.
कळवण तालुक्यातील नांदुरी घाटातील कळवण-दिंडोरी हद्दीत नाशिककडे भाजीपाला घेऊन जाणारी वाहने अडवून वाहनांची तपासणी करून भाजीपाल्याची वाहने माघारी पाठवली. घोटी येथे आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी कालपासून पुकारलेल्या संपाला दुसऱ्या दिवशी इगतपुरी तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. घोटीतील बाजार समितीत शेतकऱ्यांची शेतमालाची एकही गाडी न आल्याने कायम गजबजलेल्या या बाजार समितीत शुकशुकाट जाणवत होता. दरम्यान, रात्रीच्या सुमारास मुंबईला भाजीपाला घेऊन जाणारा ट्रक उभाडे शिवारात संतप्त शेतकऱ्यांनी रोखून ट्रकमधील शेतमाल रस्त्यावर फेकला. दरम्यान, या संपाला हिंसक वळण लागू नये यासाठी पोलीस प्रशासनाने पुरेपूर खबरदारी घेतली असून, महामार्गावर घोटी टोलनाका येथे पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
दिंडोरी (तास) येथे शेतकऱ्यांनी दिंडोरी -नांदूरमध्यमेश्वर रोडवर ५ ते ६ टायर जाळून निषेध व्यक्त केला यामुळे या मार्गावर वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. दरम्यान नांदूरमध्यमेश्वर गावातील चौकात सकाळी शेतकर्यांनी नागरिकांना मोफत दूध वाटप केले. निफाड ,कोठूरे , नैताळे येथे कडकडीत बंद पाळण्यात आला तर शिवरे , कोठूरे फाटा ,दिंडोरी (तास ) ,पिंपळस (रामाचे ) येथे शेतकर्यांनी विविध मार्गाने आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. शुक्र वारी सुद्धा तालुक्यातील पिंपळगाव व लासलगाव कृउबा बंद असल्याने कुठलाही शेतमालाचा व्यवहार होऊ शकला नाही शिवाय तालुक्यातील सर्व दूध संकलन केंद्र , भाजीपाला बाजार बंद होते
नाशिक औरंगाबाद रोडवर शिवरे फाट्यावर आंदोलक आक्रमक होत असल्याचे पाहून दंगा नियंत्रक पथक आणि निफाड पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार करून त्यांना पांगवले. यातील 26 आंदोलकांना पोलिसांनी अटक केली शेतकरयांनी नाशिक औरंगाबाद रोडवर कोठूरे फाट्यावर दूध,कांदे ओतून आपला संताप व्यक्त केला

डांगसौंदाण्यात सामूहिक मुंडण
बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे येथे शेतकऱ्यांनी आक्र मक होत सरकारची अंत्ययात्रा काढुन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत राज्यसरकार विरोधात घोषणाबाजी केली. सकाळपासून डांगसौंदाणे येथिल सर्व व्यावसायिकांनी आपापली सर्व दुकाने बंद ठेवून शेतकर्यांनी सामुहिक मुंडन केले. डांगसौंदाणे बस स्थानकांवर यावेळी शेतकर्यांनी टोमॅटो कांदा रस्तावर टाकून निषेध नोंदवित जोरदार घोषणाबाजी केली.


सामूहिक मुंडण करून निषेध
सटाणा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सामूहिक मुंडण करून सरकारचा निषेध नोंदविला, तर मालेगाव येथे दुधाचे नऊ टँकर अडवून रस्त्यावर ओतले. शिवरे फाट्यावर लाठीमार करण्यात आला. ]

 

मालेगावचे चार पोलीस निलंबित
मालेगावच्या चंदनपुरी शिवारात मुंबई- आग्रा महामार्गालगतच्या पेट्रोलपंपावर उभ्या असलेल्या दुधाच्या नऊ टॅँकरमधील दूध ओतून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पिटाळले नसल्यामुळे बंदोबस्तावरील चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस प्रमुख अंकुश शिंदे, अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे.
शहरालगतच्या गिरणा पुलावर संपकरी शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले होते. या आंदोलनस्थळी वेगवेगळ्या गावातील शेतकरी एकत्र आले. यावेळी पंपावर दुधाचे टॅँकर उभे असल्याची माहिती काही शेतकऱ्यांना मिळाली. तब्बल एक तास सुरू असलेले आंदोलन व रस्त्यावर दूध ओतण्याच्या दरम्यान परिसरात बंदोबस्तावर असलेल्या किल्ला पोलीस ठाण्याचे जमादार एस. पी. पवार, हवालदार बी. सूर्यवंशी, नाईक बाळासाहेब निरभवणे, भाऊसाहेब वाघ यांनी आंदोलनकर्त्यांना मज्जाव केला नाही. तसेच आंदोलनकर्त्यांना रोखले नाही असा ठपका ठेवत जिल्हा पोलीस प्रमुख अंकुश शिंदे व अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी चौघांना तडकाफडकी निलंबित केले आहे. या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Web Title: Keeping the eye in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.